विराट कोहलीचे कौतुकाचे शब्द, “देवदत्तचे शतक झाले नसते तर आश्चर्य वाटले असते”.

Maharashtra Today

कोरोनावर (Corona) मात करून मैदानात उतरल्यावर राजस्थान राॕयल्सविरुध्द (RR) विजयी शतकी खेळी करणाऱ्या राॕयल चॕलेंजर्सच्या (RCB) देवदत्त पडीक्कलचे (Devdutta Padikkal) त्याचा व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भरभरून कौतुक केले आहे. हा खेळाडू आपली भविष्याची ठेव असून तो या शतकाचा हक्कदार आहे असे कोहलीने म्हटले आहे. देवदत्तने या सामन्यात 52 चेंडूतच नाबाद 101 धावांची खेळी करताना आपल्या कर्णधारासोबत 181 धावा फळ्यावर लावून राॕयल चॕलेंजर्सचा एकही गडी न गमावता दणदणीत विजय साजरा केला.

ह्या डावखुरा सलामी फलंदाजाचा तंत्रशुध्द फलंदाजी करण्याकडे कल असल्याने तो टी-20 क्रिकेटसाठी पाहिजे तशा स्ट्राईक रेटने धावा करू शकेल याबद्दल अनेकांना शंका होती पण गेल्या वर्षीचे आयपीएल, त्यानंतर सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचे सामने आणि आता ह्या खेळीसह त्याने ह्या शंका निरर्थक असल्याचे सिध्द केले आहे.राजस्थानविरुध्द तर त्याने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या.

त्याच्या या खेळीबद्दल विराट कोहलीने म्हटलेय की ही खेळी खास आहे. गेल्या मोसमातही तो चांगलाच खेळला होता. त्याने 40 ते 50 धावानंतर धावांची गती वाढवावी अशी चर्चा होती. त्या चर्चांना आता त्याने पूर्णविराम दिला आहे. हा प्रतिभावान खेळाडू आपल्यासाठी भविष्याची ठेव आहे.

या 20 वर्षीय खेळाडूचे 51 चेंडूतील हे शतक म्हणजे राॕयल चॕलेंजर्ससाठी दुसरे सर्वात जलद शतक आहे. आरसीबीसाठी त्याच्यापेक्षा जलद शतक फक्त विराट कोहलीनेच (47 चेंडू) केले आहे.

गुरुवारी हे दोघे खेळपट्टीवर होते तेंव्हा विराट कोहलीने आपल्या या युवा खेळाडूबद्दल वापरलेली रणनितीसुध्दा कौतुकास्पद होती. विराटने स्ट्राईक रोटेट करुन तरुण देवदत्तला फलंदाजीची पुरेपूर संधी दिली आणि स्वतः दुय्यम भूमिका घेतली. त्यांच्या शतकी सलामीत विराट कोहलीच्या 23 चेंडूत केवळ 25 धावा होत्या आणि देवदत्तचे योगदान 35 चेंडूत 79 धावांचे होते.

देवदत्तच्या या शतकाचे वैशिष्ट्य हे की 52 चेंडूंच्या या खेळीदरम्यान त्याचा चेंडू खेळायचा अंदाज चुकण्याचे प्रमाण म्हणजे फाॕल्स शॉट फक्त 7.6 टक्के होते आणि यापेक्षा कमी फाॕल्स शॉटसह आयपीएलमध्ये शतक फक्त विराट कोहली व ए.बी. डी’विलियर्स यांचेच आहे.

कोहली म्हणतो की यावेळी माझी भूमिका वेगळी होती. मला फक्त टिकून रहायचे होते. आम्ही शतकाबद्दलही बोललो, तर तो म्हणाला की, आणखी बरीच शतके होणार आहेत. तेंव्हा मी त्याला म्हणालो की, तुझे पहिले शतक लागल्यावर तू माझ्याशी त्या विषयावर बोल. त्याने आता हाच फाॕर्म पुढे कायम ठेवावा आणि संघाला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे. त्याची ही खेळी निर्दोष होती त्यामुळे त्याचे शतक झाले नसते तर आश्चर्य होते असे विराटने आपल्या या युवा फलंदाजाबद्दल म्हटले आहे.

देवदत्त हा आयपीएलमध्ये शतक करणारा तिसरा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. शिवाय मनीष पांडे, शाॕन मार्श आणि पाॕल वाल्टाथी नंतर आयपीएल शतक केलेला तो पहिला अनकॕप्ड खेळाडू आहे. अनकॕप्ड खेळाडूंमध्ये सर्वात जलद शतक त्याने आपल्या नावावर केले आहे आणि 21 व्या शतकातील जन्मतारीख असलेला तो आयपीएलचा पहिलाच शतकवीर आहे.

गेल्यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना त्याने चार डावात तीन अर्धशतके केली होती.आयपीएलच्या पदार्पणातच अनकॕपड् खेळाडूकडून सर्वाधिक धावा करायचा विक्रम केला होता आणि आता त्याने आरसीबीसाठीचे दुसरे सर्वात जलद शतक केलेले आहे.

काही दिवसांपूर्वी तो कोव्हीड- 19 शी लढत होता आणि ती लढाई जिंकल्यावर संधी मिळायची तो वाट बघत होता. याच्याआधीच्या सामन्यात संधी मिळाली नाही तेंव्हा वाईट वाटले होते असे तो सांगतो. आपले शतक पूर्ण होण्याआधी कर्णधार विराटने विजयी धाव काढली असती तरी आपल्याला फार काही वाईट वाटले नसते कारण आपण शतकाचा विचार करत नव्हतो असे त्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button