मराठ्यांना डावलून नोकर भरती होऊ देणार नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा निर्धार

- ओबीसी समाजाचे नेते समाजातील वातावरण खराब करत आहेत - टीका

abasaheb patil

नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत मराठा विद्यार्थ्यांना डावलून नोकर भरती प्रक्रिया होऊ देणार नाही, असा निर्धार मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी व्यक्त केला.

राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशी भूमिका घेतली होती. राज्य सरकारने मराठा समाजाच्या जागा वगळून नोकरभरती सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर आबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी समाजाच्या नेत्यांवर टीका केली. म्हणालेत, ओबीसी समाजाचे नेते चुकीची वक्तव्ये करुन समाजातील वातावरण खराब करत आहेत. ओबीसी नेत्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. यानंतर मराठा आणि ओबीसी नेत्यांमधील शाब्दिक युद्ध तापण्याची चिन्हे आहेत.

विजय वडेट्टीवार

ओबीसी समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी (Vijay Vadettiwar) केला होता. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.

आम्हीसुद्धा SEBC – हरिभाऊ राठोड

मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी भाजपला धारेवर धरले. फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे SEBC आहेत, असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले.

मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकली. तसंही आम्ही SEBC होतो आणि आताही आहे, पण मधल्या काळात भाजपाने लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राठोड यांनी भाजपावर केला.

SEBC चा लाँग फॉर्म कधी दिला नाही. मराठ्यांना आम्ही SEBC देतो म्हणजे काही तरी वेगळं देतो असं ते सांगत होते. पण मधल्या काळात भाजपाने लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आरक्षण हे लोकसंख्येनुसार सगळ्यांना देता येईल, असे वक्तव्य केले. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास लोकसंख्येची गणना करावी लागेल, आपल्याला 2021च्या लोकसंख्येच्या गणनेची वाट बघायची गरज नाही. आपण आठ दिवसांतही लोकसंख्येची गणना करू शकतो, असेही हरिभाऊ राठोड म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER