पत्नीच्या बँक खात्यांचा तपशिल ‘आरटीआय’खाली मागता येत नाही

RTI Act
  • केंद्रीय माहिती आयोगाने पतीला दिला नकार

नवी दिल्ली : पत्नीने दाखल केलेले प्राप्तिकराचे रिटर्न व त्यात तिने दिलेला तिच्या बँक खात्यांचा तपशील त्या पत्नीच्या पतीलाही माहिती हक्क कायद्यानुसार (RTI ACT) उघड केला जाऊ शकत नाही, असा निकाल केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे.

केंद्रीय माहिती आयुक्त नीरज कुमार गुप्ता यांनी हा निकाल देताना म्हटले की, करनिर्धारणासाठी प्राप्तिकर विभागाकडे रिटर्न सादर करणे हा नागरिकाच्या सरकारप्रती कर्तव्याचा एक भाग आहे. हे काही सार्वजनिक काम नाही. त्यामुळे याच्याशी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक हित निगडित नाही.

हे प्रकरण दिल्लीतीलच होते. त्यात पवन कुमार सालुजा या पतीने त्याची पत्नी ममता आरोरा हिने दाखल केलेले प्राप्तिकराचे रिटर्न व त्यांत तिने दिलेला तिच्या बँक खात्यांचा तपशील याची माहिती मिळविण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या माहिती अधिकाºयाकडे ‘आरटीआय’ अर्ज केला होता. आधी माहिती अधिकाºयाने व नंतर अपिली प्राधिकाºयानेही अर्ज फेटाळल्याने या पतीने केंद्रीय माहिती आयोगाकडे अपील केले होते.

तिन्ही स्तरावरील या एकमुखी निकालांमध्ये माहिती नाकारताना प्रामुख्याने दोन मुद्दे विचारात घेतले गेले:

१. प्राप्तिकर रिटर्न आणि बँक खात्यांचा तपशील ही संबंधीत व्यक्तीशी संबंधित खासगी स्वरूपाची माहिती आहे. त्यामुळे कोणाही त्रयस्थाला अशी माहिती मागता येत नाही व देताही येत नाही. याचा सार्वजनिक हित हा अपवाद आहे. म्हणजे अशी खासगी माहिती एखाद्या त्रयस्थाला उघड करणे सार्वजनिक हितासाठी गरजेचे असेल तर अशी माहिती खासगी असूनही ती दिली जाऊ शकते. परंतु व्यक्तिगत स्वरूपाचे प्राप्तिकर रिटर्न व त्यात दिलेला बँक खात्यांचा तपशील यात ज्याला सार्वजनिक म्हणता येईल असे काहीच नाही.

२. येथे ‘आरटीआय’ अर्ज करणारा अर्जदार आपल्याच पत्नीशी संबंधित माहिती मागत असला तरी कायद्याच्या दृष्टीने परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. कारण ‘आरटीआय’ कायदा अर्ज करणारी व्यक्ती सोडून इतर सर्वांना ‘त्रयस्थ पक्ष’ मानतो. त्यामुळे नाते पत्नीचे असले तरी तीसुद्धा या कायद्यानुसार ‘त्रयस्थ पक्ष’च ठरते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER