डेस्टिनेशन ” आनंद “

Destination Happiness

रोजच्या दैनंदिन चाकोरीत फिरणारे असे आपले दररोजचे आयुष्य असते. या प्रत्येक आपल्या फिरण्याच्या परिघावर एक सीमारेषा आखली गेलेली असते. त्यात मग दररोज कुणाबरोबर तरी वाद नाही तर कुरबुरी होतात आणि ताण आपली मर्यादा सोडतो. तो वाद केवळ एक निमित्त असतं. मूळ कारण असतं ते आपलं चाकोरीतील दररोज जगणं. आपली चाकोरीबद्ध विचारसरणी !त्यामुळे आपण त्रासून जातो. याचबरोबर कधीकधी जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात, प्रिय व्यक्ती, आप्ताचा मृत्यू, आर्थिक विवंचना, नैराश्य अशाने कुणीही कोलमडून पडू शकत.

प्रत्येकच व्यक्ती खूप आशा-आकांक्षा घेऊन खूप काही मिळवण्यासाठीची धडपड करत असतो. यश, ध्येय, साध्य यांना मिळवण्यासाठी आयुष्य घालवताना ते मिळाल्यावर अचानक,” अरेच्या !जगायचं तर राहूनच गेलं ! “ही जाणीव होते. ऋषिकेश मुखर्जींच्या “आनंद” या कलाकृतीची सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती साजरी होत असताना, त्यातील आनंद कडूनच याचे उत्तर मिळते. भौतिक गोष्टींचा आनंदातून बाहेर पडून स्वतःवर प्रेम करायला आणि इतरांवर प्रेम करायला तो शिकवतो. “बाबूमोशाय जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है जहापन्हा. मै मरने से पहले मरना नही चाहता l ” “बाबूमोशाय ! जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही ! “अर्थातच अर्धा भरलेला पेला बघण्याचा हा दृष्टीकोन म्हणजेच तर आनंद.

आनंदाचे रासायनिक विश्लेषण असते. आयुष्य केवळ जगण्यासाठी नाही तर ते सुंदर करण्यासाठी म्हणून आज अनेक लोक काम करतात आहे. सर्वत्र संचार करणारे मन हा एक प्रकारचा रिमोट कंट्रोल आहे. सभोवतालची सतत बदलणारी परिस्थितीचे भान ठेवणे, अनुमान काढणे, त्याप्रमाणे मनाची प्रतिक्रिया देणे हे सगळे काही क्षणात करण्याची कार्यक्षमता रसायनांच्या माध्यमातून होत असते. हार्मोन्स एन्झाईमस् यांच्यातून शरीरात विविध क्रिया होतात. त्यांची सूत्र मेंदूकडे असतात पण रसायनांचे नियंत्रणाचे काम मनाचे असते. म्हणूनच शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत चालू ठेवून मन तीक्ष्ण, पण आरामदायक असणे म्हणजे आनंद. यामुळे कार्यक्षमता टिकून राहते, सुंदर जीवनेच्छा (Eros) हाच मनाचा स्थायीभाव आहे. हा कितीही प्रभावी असला तरी प्रसंगी मनाला ताण पडतोच. त्याचा तोल जातो. पण परत मुळ स्थितिकडे यायला सुरक्षा यंत्रणा (डिफेन्स मेकॅनिझम) ची शक्ती दिलेली असते. मात्र याचाही अतिरेकी वापर आनंदाला मारक ठरतो. शरीर व मनाची कार्य व्यवस्थित व शिस्तबद्ध ठेवली तर आनंद निर्माण करता येतोच.

प्रत्येक व्यक्तीला जशी पिढीजात संपत्ती मिळते, तशीच अंगकाठी, केसाचे रंग डोळ्यांचे रंग स्वभाव वैशिष्ट्य अनुवंशिक असतात. तसेच आनंदी असणे हे पण दैवजात असते, अनुवंशिक असते. उदाहरणार्थ विचार प्रक्रिया, विचारांची शैलीही पद्धती भावभावना यासुद्धा वारसाहक्काने येतात. एखाद्या विषयावर भावा भावांची मत एक सारखी येतात हा अनुभव आपण बरेचदा घेतो. पण आनंदी राहायला शिकणे आत्मपरीक्षण करून आपल्या कमतरता ओळखून दोष घालवून शक्य असतं, ते आपल्या हातात असत. स्वभावाला औषध असते म्हणा ना !

आनंदाला अनेक मारक गोष्टी, म्हणजे काही अप्रिय घटना किंवा दुःखद प्रसंग, एखादी आपत्तीची बातमी किंवा कुणाचं वागणं-बोलणं त्यामुळे आनंद नाहीसा होऊ शकतो. बरेच दा म्हणजे 90 टक्के पर्यंत लोकांच्या दु:खाला दुसऱ्याने काही बोललेले, हेच कारण असते असे दिसून येते.

त्याच बरोबर अनेक अंतर्गत घटक आनंदाला मारक ठरू शकतात.

  • उदाहरणार्थ प्रत्येकाच्या मनात असलेले षड्रिपू ! त्याचप्रमाणे नसलेल्या संकटं बाबत केलेला काल्पनिक विचार निराशा आक्रमकता खुन्नस राग सूडचक्र यामुळे अनेक मनोकायिक आजार व गैर कृत्येही घडत असतात.
  • व्यसनांचा असलेला पगडा त्याचप्रमाणे अतिमहत्त्वाकांक्षी अशा ही सुद्धा माणसाला जाळू शकते. आपली कुवत योग्यता न बघता केवळ दुसऱ्याशी तुलना करून मृगजळामागे धावत राहिल्याने व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास होतो. त्यामुळे कुठे थांबायचं याचं भान खूप महत्त्वाचं आहे. त्याच प्रमाणे *मनुष्य अनेक गंड मनात बाळगून राहतो त्यातून येणारे विचार व भावना हे गढूळ असल्याने त्या व्यक्तीला व सभोवतालच्या सगळ्यांनापण त्या त्रासदायक होतात. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगळी असते आणि आनंद हा मानण्यावर असतो हेही खरंच !

ताणतणाव विरहित सुदृढ मनाची व्यक्ती कशी असते? तर परिस्थितीशी त्यात होणाऱ्या बदलांबरोबर जुळवून घेण्याची क्षमता असून दैनंदिन प्रश्नांना सामोरी जाताना स्वतः जी सक्षम आणि कार्यकुशल असते. जीवन परस्परावलंबी आहे हे मान्य करून समाधानकारक नातेसंबंध जोपासते. विचारात सकारात्मकता असणारी, दुसऱ्यांच्या भावना नीट जाणून, घेऊन आपल्या स्वतःतील सद्गुणांचा शोध घेत, स्त्रियांच्या आयुष्यातील ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करणारी असते.

ताणतणावातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधलेत तर बरेचदा आनंद मिळवता येतो. पण आपण ताणात आहोत आपण स्वीकारत नाही आणि उगीचच सगळं काही ही गुडी गुडी असल्याचे नाटक करतो खरंतर भावनिक व असमतोलही निर्माण झालेला असतो. त्याचा त्रासही होत असतो. पण तेही मान्य करत नाही.

ही बातमी पण वाचा : इन्स्पिरेशनवाला आनंद !

पण जर याचा स्वीकार केला आणि तणावामागील कारणांचा शोध घेऊन त्याची कारणांसहित यादी केली तर काम सोपं होऊन जातं. आपली भावनिक कुचंबना नाकारली तर ती शारीरिक व्याधी च्या रूपाने बाहेर पडते. म्हणूनच कुठल्या भावनेमुळे जास्त त्रास होतोय ? कुठल्या परिस्थितीतून, घटनेतून ती निर्माण झाली? त्याबाबत मी मनाशी विचार काय केला ? याचा विचार लिहून ठेवावा. आणि नंतर त्या विचारांना विवेकाच्या कसोटीवर घासावे. जी गोष्ट घडल्याने मला हा त्रास होतो ती परिस्थिती घटना माझ्या हातात किंवा नियंत्रणात आहे काय की नियंत्रणाबाहेर? माझ्या हातातले त्यासाठीचे पर्याय काय ? आलेलं अपयश हे केवळ एखाद्या घटने पुरते असू शकते ते अपयश पूर्ण आयुष्य अपयशी ठरवत नसते. कधी कधी काही संकटे परिस्थिती ही काही काळापुरती असते ही परिस्थिती जाईल याचा विचार करा ..याने ताण दूर होतील.

आता आपल्याला आनंद कसा मिळेल ? खरंतर दुसर्‍याच्या आनंदात सहभागी होऊ शकणे आणि दुसऱ्याचा आनंद द्विगुणीत करणे याने सच्चा आनंद मिळतो. सख्या मित्र-मैत्रिणी, निसर्ग सहवास हा आनंद निर्माण करतो. आनंद हा निर्माण करावा लागतो, मानावा लागतो ते जर जमत नसेल तर छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणे, उदास होणे चालत राहते. यासाठी कुठल्याही परिस्थितीत कटकट न करता राहता येणे हा आनंदोत्सव ठरू शकतो.

मनाजोगते काम झाले की श्रमपूर्तीचा आनंद होतो. आपल्याला आधार देणारी माणसे आहेत, आपण एकटे नाहीत ही भावना पण आनंद देते. घर स्वच्छ झाडून झाल्यावर मान वाकडी करून बघणे, काढलेल्या रांगोळी कडे बघणे म्हणजे आनंद! रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागणे हा देखील आनंदच ! आनंद कुठे बाहेर शोधायला जावा लागत नाही. तो आपल्या आतच असतो.

तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं.”आनंदाचे डोही, आनंद तरंग !”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER