पहिला सिनेमा हिट होऊनही जावेद जाफरीचे झाले नुकसान

Javed Jeffry

बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराचा पहिला सिनेमा जेव्हा सुपरहिट होतो आणि त्याच्या अभिनयाची, नृत्याची प्रशंसा होते तेव्हा त्याचे करिअर नक्कीच उंचावर जाते. पण काही कलाकार असे असतात की, पहिला सिनेमा सुपरडुपर हिट होऊनही त्यांना त्याचा फायदा होत नाही. अशाच कलाकारांमध्ये जावेद जाफरीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नायकाला आवश्यक असलेला चेहरा, शरीरयष्टी आणि उत्कृष्ट डान्स या तिन्ही गोष्टीत पारंगत असतानाही जावेद जाफरी मागे पडला तो केवळ त्याच्या पहिल्या सिनेमामुळेच. स्वतः जावेद जाफरीनेच ही खंत बोलून दाखवली.

खरे तर जावेद जाफरी हा एक चांगला अभिनेता आहे. तो केवळ अभिनेताच नव्हे तर तो एक चांगला डान्सर, कॉमेडियन आणि व्हॉईस आर्टिस्टही आहे. त्याने ‘ओह डार्लिंग ये है इंडिया’, ‘जजंतरम ममंतरम’, ‘सलाम -नमस्ते’, ‘सिंह इज किंग’, ‘3 इडियट्स’ असे खूप सिनेमे केले. तसेच ‘बूगी वूगी’सह अनेक शो होस्टही केले. एवढेच नव्हे तर त्याने व्हॉइस आर्टिस्ट म्हणून फन शो ‘टकेशीज कॅसल’मध्ये विविध आवाज काढले होते. तसेच त्याने डिज्नीच्या मिकी माउस, गूफी, डॉन कारनेजना आवाजही दिलेला आहे. असे असूनही तो नायक म्हणून यशस्वी झाला नाही.

याबाबत बोलताना जावेदने सांगितले, सुभाष घई यांनी मला खूप मोठी संधी दिली आणि ‘मेरी जंग’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांनी मला एक अत्यंत उत्कृष्ट असा ब्रेक देऊन मला लाँच केले. सिनेमा सुपरहिट झाला; पण मी खलनायकाची भूमिका साकारल्याने माझ्याकडे सगळे निर्माते खलनायकाच्या भूमिकेसाठी पाहू लागले होते. याला नायक म्हणून सिनेमात कसे घ्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला होता. त्या काळात खलनायक डान्स करायचा नाही. फक्त नायक डान्स करीत असे. मी तर उत्कृष्ट डान्सर होतो. सुभाष घई यांनी जावेदमध्ये हीरो मटेरियल असताना त्याला खलनायक म्हणून का लाँच केले, असा प्रश्न लोकांना पडला होता.

त्यामुळेच पहिल्या सिनेमानंतर मला चांगल्या भूमिका मिळण्यास खूप वर्षे लागली. मला सिनेमे मिळत होते; पण मी त्यात खूश नव्हतो. त्या काळात टीव्हीने मला चांगली लोकप्रियता मिळवून दिली. टीव्हीवरील माझ्या कामाची शम्मी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मेहमूद, जयाप्रदा यांनी प्रशंसा केली होती, असेही जावेदने यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER