केंद्राची मदत मिळाली नसतानाही आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- विजय वडेट्टीवार

Vijay Vadettiwar

नागपूर :- कधी न आलं असं मोठं संकट महाराष्ट्रावर कोसळलं असताना केंद्र सरकार राज्यासोबत दुजभाव करत आहे. भाजपला महाराष्ट्रातील लोकांनी मतं दिली नाही का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे आमदार राज्यात निवडून आले. महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचे १०५ खासदार निवडून दिले. पण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती असल्याची घणाघाती टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना वडेट्टीवारांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं असल्याचा विश्वास दिला आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांना सरकारनं मदत केली. केंद्राला मदतीसाठी तीन पत्रं लिहिली, पाहणी पथकं पाठवण्यासाठी मागणी करण्यात आली. तरीदेखील केंद्राकडे प्रस्ताव आलाच नाही असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही आता आणखी एक पत्र पाठवणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे. शेतकऱ्यांची मतं मिळाली म्हणून तुम्ही केंद्रात आहात. मात्र, त्यांनाच मदत दिली जात नाही. भाजप नेते चुकीचं विधान करतात आणि राज्याला मदत करायची नाही ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने भाजप गळा काढत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

ही बातमी पण वाचा : मंत्री असताना तुम्ही केलेले धंदे उघडे करण्यास भाग पाडू नका, वडेट्टीवार यांचा बावनकुळेंना इशारा

महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभं असून २२९७ कोटींची मदत आम्ही दिवाळीच्या आधीच दिली आहे. शेतकाऱ्यांसोबत उभं राहण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. १०० टक्के कापूस खरेदी आम्ही केली. पुढच्या आठवड्यात शेतकरी मदतीचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे. १० डिसेंबरपर्यंत पूर्ण निधी शेतकऱ्यानंपर्यंत पोहचेल अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे. तर किसान सन्मान योजनेत ६०० कोटींची मदत केंद्र सरकार करते. पण तीदेखील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांचा  घोर अपमान करत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातील विजेची बिलं माफ केली जाणार नाहीत, असे सांगत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सामान्यांना शॉक दिल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी नवे वक्तव्य करून संभ्रम आणखीनच वाढवला.

लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोक आम्हाला भेटून निवेदने देत आहेत. त्यामुळे ऊर्जा खात्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. लोकांवर अन्याय होत असेल, काही चुकीचं होत असेल तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. ५० टक्के लोकांनी बिल भरले आहे. त्यामुळे आता केवळ उर्वरित ५० टक्के लोकांचा प्रश्न आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत केली. त्याप्रमाणे गरज पडल्यास वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसाव्या लागणाऱ्या लोकांनाही मदत झाली पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER