देशमुखांचा राजीनामा शरद पवारांच्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई :- गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसांत सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टानं दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तत्काळ अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला.

पवारांनी दिलेल्या आदेशानुसार अनिल देशमुखांनी तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आपला राजीमाना दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे ॲड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब, मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती. अशा आशयाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना  दिला आहे. काही वेळेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सिल्वर ओकवर बैठक झाली. सीबीआय चौकशीच्या कोर्टाच्या निर्णयामुळं अनिल देशमुख राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. तर देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रिपदासाठी  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button