गृहमंत्री देशमुखांची चौकशी निव्वळ फार्स, चौकशी कमिशन ऑफ एनक्वायरी अ‍ॅक्ट अंतर्गत नाही

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. विरोधकांकडून सतत होत असलेल्या टीकेनंतर आता आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापन केली. मात्र विरोधकांना केवळ शांत करण्यासाठी देशमुखांवर झालेल्या गंभीर आरोपांची चौकशी कमिशन ऑफ एनक्वायरी अ‍ॅक्ट अंतर्गत केली जाणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून ही चौकशी केली जाणार आहे. अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस आयुक्त सचिन वाझे यांना दर महिन्याला मुंबईत १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करून देण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक आरोप २० मार्च रोजी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून परमबीर सिंग यांनी केला होता. या पत्राने प्रचंड खळबळ उडाली होती. देशमुख यांनी या आरोपाचा इन्कार करताना आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे म्हटले होते.

राज्य सरकारने आज एक आदेश काढून निवृत्त न्या. चांदिवाल समितीची स्थापना केली. ही समिती आता अनिल देशमुख यांच्यावर त्या पत्रात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करेल. देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतीही गैरवर्तणूक/गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल असा काही पुरावा परमबीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का याची चौकशी करेल. या आरोपांच्या अनुषंगाने देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीवृंदाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणेमार्फत तपासाची गरज आहे का, तसा काही गुन्हा त्यांनी केलेला आहे का याची चौकशीदेखील चांदिवाल समिती करणार आहे. ही समिती सहा महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करेल.

चौकशी आयोग कायद्यांतर्गत म्हणजे कमिशन ऑफ एनक्वायरी अ‍ॅक्टअंतर्गत ही चौकशी केली जाणार नसल्याने चांदिवाल समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याचे बंधन राज्य सरकारवर नसेल असे एका ज्येष्ठ विधिज्ञाने महाराष्ट्र टुडेला सांगितले. तसेच या अहवालातील नेमक्या कोणत्या शिफारशी स्वीकारल्या आणि त्यावर कुठली कृती करण्याचे (अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट) शासनाने ठरविले आहे हे सांगणेही राज्य सरकारवर बंधनकारक नसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button