नैतिकच्या आधारे देशमुखांनी राजीनामा द्यावा अथवा पवारांनी घ्यावा, फडणवीसांची मागणी

Maharashtra Today

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अ‍ॅड. जयश्री पाटील (Jayshree Patil) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचा हा निकाल अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर आता भाजपचे नेते पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने देशमुख प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. या आदेशामुळे आता हप्तेवसुलीचा पर्दाफाश होईल. राज्याला काळीमा फासणारा हा जो कारभार मधल्या काळात झाला. त्याचं सत्य सीबीआय चौकशीतून समोर येईल, असं फडणवीस म्हणाले.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केला होता. त्याला उच्च न्यायालयाने जोरदार उत्तर दिलं आहे. न्यायालयाने हप्ते वसुलीविरोधात कडक पाऊल उचललं आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं सांगतानाच पोलीस गृहमंत्र्यांची चौकशी करूच शकत नाही. कारण पोलिसांवर दबाव असल्याचं दिसून येत होतं, असंही ते म्हणाले. अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं. त्यातून सर्व सत्यबाहेर येईल. ते निर्दोष असतील तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं. त्याला आमचा विरोध असणार नाही. परंतु, तूर्तास चौकशी होईपर्यंत तरी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण आता हे प्रकरण राजकीय राहिले नसून ते सीबीआयकडे गेलं आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही लक्ष्य केले. राज्याच्या इतिहासात अश्याप्रकारे एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण असो किंवा रश्मी शुक्ला यांनी केलेले आरोप असो मुख्यमंत्र्यांनी यावर एकही शब्द काढला नाही, ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. सुरुवातीला सचिन वाझे ओसामा बिन लादेन आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. सोबतच गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी आता राजकीय नसून सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानासाठी आहे. यासाठी नैतिकतेच्या आधारावर एक तर स्वतः अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अथवा शरद पवार (Sharad Pawar) किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

ही बातमी पण वाचा : गृहमंत्री देशमुखांना उच्च न्यायालयाचा धक्का; परमबीर सिंग यांच्या आरोपाचा तपास सीबीआयकडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button