
मुंबई: ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चात्मक कार्यक्रमातून मुंबई पोलीस दलातील परिमंडळ ९ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे (Abhishek Trimukhe)यांची बदनामी केल्याबद्दल त्या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) यांच्याविरुद्ध बदनामीचा फौजदारी खटला चालविण्यासाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या संमतीनंतर सत्र न्यायालयातील पब्लिक प्रॉसिक्युटर कार्यालयाने त्याच न्यायालयात भादंवि कलम ४९९, ५००, ५०१ व ३४ अन्वये ही फिर्याद दाखल केली गेली आहे. त्यात गोस्वामी यांच्याखेरीज ‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनीची मालक कंपनी मे. आऊटलायर मीडिया प्रा. लि. ही कंपनी आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गोस्वामी यांच्या पत्नी श्रीमती सम्यब्रत यांना आरोपी करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर ‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनीवरून गेल्या ऑगस्ट महिन्यात प्रसारित करण्यात आलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाच्या संदर्भात ही फिर्याद आहे. सुशांत सिंगची मैत्रिण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या मोबाईल फोनचे ‘कॉल रेकॉर्ड’ तपासण्याच्या संदर्भात ती चर्चा होती व अर्णव गोस्वामी त्या चर्चेचे ‘अॅकर’ होते.
फिर्याद म्हणते की, चर्चेचा विषय भलतीकडेच भरकटत नेऊन आणि पत्रकारितेची मूल्ये वार्यावर सोडून व्यक्तिश: उपायुक्त त्रिमुखे यांची नावानिशी व एकूणच मुंबई पोलीस दलाची नाहक बदनामी करण्यात आली. ही आक्षेपार्ह चर्चा नंतर यूट्यूूवरही टाकण्यात आली, जेथे गोस्वामी यांचे दोन लाखांहून अधिक ‘फॉलोअर्स’ आहेत.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला