देवा पांडुरंगा, बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे, जगाला कोरोनामुक्त कर ! – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई :- “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करून सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोना योद्ध्यांना बळ दे…  त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपूरच्या पांडुरंगा चरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ही बातमी पण वाचा:- आषाढी महापुजेचा मान मिळवणारे उद्धव हे ठाकरे घराण्यातले ठरले पहिले नेते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं आहे. तसेच महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, असं साकडंही विठ्ठलाकडे घातलं आहे. पंढरपूरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा या वर्षीही प्रतीकात्मक पद्धतीनं कायम राखली गेली. संतांच्या पादुका परंपरेनुसार पंढरपूरला पोहचल्या, याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून, आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे. पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून संपलेलं असेल आणि पुन्हा आपण नाचत, गाजत पंढरपूरची वारी करू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेनं अधिक काळजी घ्यावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER