सचिन वाझे प्रकरण : ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

Ajit Pawar Maharastra Today

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याबाबत आज (मंगळवार) माध्यमांसमोर बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूमिका स्पष्ट केली. “कुणाला मंत्रिमंडळात ठेवायचं, कुणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” असे यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवले.

सुरुवातीपासून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहे, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं महाविकास आघाडी सरकारचं काही कारण नाही आणि सरकार तसं अजिबात करणार नाही. हे मीदेखील राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने स्पष्ट करू इच्छितो. एनआयए व एटीएस या दोन्ही तपास यंत्रणा आता चौकशी करत आहेत. त्यामुळे ज्या काही घटना समोर येत आहेत, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल हे मी स्पष्टपणे सांगतो, असे पवार म्हणाले .

“महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सररकार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन तयार केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात काही कारण नाही. कुणी कुठल्या पक्षात होतं, कुठल्या पक्षात नव्हतं तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. आता काही दिवसांपूर्वी सभागृह सुरू असताना मला सभागृहात विरोधी पक्षाने एक गोष्ट लक्षात आणून दिली की, विरोधी पक्षनेत्याबद्दल सोशल मीडियावर (Social Media) काही चुकीच्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी ताबडतोब आम्ही सभागृहात सांगितलं की, संध्याकाळ होण्याअगोदर त्या संदर्भातील चौकशी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला अटक केली जाईल, त्यानंतर रात्रीपर्यंत संबंधितास अटक करण्यात आली. तशाच पद्धतीने आता या दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कुणाचाही असता कामा नये हीच आमची, सरकारची भूमिका आहे. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे त्या ठिकाणी जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेदेखील अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER