उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

‘कोरोना’च्या संकटाबाबत भविष्यातील धोका ओळखून नियोजन करा; सर्व यंत्रणांनी समन्वय राखून कर्तव्य करावे – उपमुख्यमंत्री

Review of corona prevention measures

पुणे :- कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त लावावी लागणार आहे. वैयक्तिक मास्कचा वापर, योग्य आंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांच्यात जनजागृती करावी लागणार आहे. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कोणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही श्री.पवार यांनी केल्या.

सद्यस्थितीत आपण सर्वजण विविध अडचणींचा मुकाबला करत आहोत. मात्र, या काळात अधिक काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम करावे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या काळात शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक तथा साथरोग नियंत्रण चे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, प्रयोगशाळा चाचणी आणि रुग्णालय भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विविध अंदाजानुसार येत्या काही आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. स्थलांतरित मजूर किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींबाबत निश्चित भूमिका घ्यावी लागणार आहे. लोक आपापल्या गावी जात आहेत. स्थलांतरित मजूर तसेच हॉटस्पॉटमध्ये येणाऱ्या व्यक्तींना त्या-त्या जिल्ह्यात 14 दिवसांकरता क्वारंटाईनमध्ये ठेवावे. ज्यांच्या घरी क्वारंटाईन करणे शक्य आहे. त्यांना घरगुती क्वारंटाईनची अनुमती द्यावी. अशी सुविधा नसल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे. क्वारंटाईन कालावधीमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांचीच तपासणी करण्यात यावी. क्वारंटाईन नंतरचा 14 दिवसाचा कालावधी हा सेल्फ रिपोर्टिंग कालावधी आहे. या काळात या व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्याने आरोग्य व्यवस्थेस कळविणे आवश्यक असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी शासनाकडून निधी ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल असे श्री.पवार यांनी सांगितले. ससून रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी तपासणी केंद्राचा इतर साथीचा आजारासाठीही उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन
पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या हॉस्पीटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसे इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत करता येण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शैलेंद्र पाठक यांनी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. या सॉफ्टवेअरबाबत श्री.पाठक यांनी सविस्तर माहिती दिली.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आयुक्त शेखर गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्तण एस. चोक्कलिंगम यांनी कोरोनाबाबतच्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Source : Mahasamvad


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER