अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे, शेतकऱ्यांचं दु:ख हलकं करण्याची ताकद दे’, अजितदादांचं विठुरायाना साकडं

Ajit-Pawar

पंढरपूर: आता कोठे धावे मन | तुझे चरण देखिलिया || भाग गेला शीण गेला | अवघा झाला आनंदु || अशीच काहीशी भावना पंढरीच्या विठुराया चरणी नतमस्तक झाल्यावर होत असते. करोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग करोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थिती होती.

‘लवकर लस येऊ दे, अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’ पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे, असं साकडं घातलं. ‘अवघ्या जगासमोर करोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ करोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो. यंदा राज्यातील जनतेच्या वतीनं आपल्याला विठ्ठलाची पूजा करण्याचं भाग्य लाभलं. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी परंपरेनुसारच होईल, असा विश्वासही अजितदादांनी यावेळी व्यक्त केला.

‘शेतकऱ्यांचं दु:ख हलकं करण्याची ताकद दे’

कोरोना संकटापासून दूर करण्यासोबतच अजितदादांनी विठ्ठलाला अजून एक साकडं घातलं आहे. राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलकं करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी विठ्ठलाकडे केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख हलकं करण्याची ताकद सरकारला दे, असं मागणंही अजित पवार यांनी घातलं. कोरोनाला आळा घालायचा असेल तर सर्वकाही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. सरकारने घालून दिलेले सर्व नियम लोकांनी काटेकोरपणे पाळावे असं आवाहनही पवार यांनी केलं.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहीद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची  प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

अजित पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट जि.वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या ‘दैनंदिनी 2021 ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : … जनता नाराज असल्याने पडेल हे सरकार , दानवेंनी शरद पवारांना दिले उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER