लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती ; अजितदादांचे केंद्राला खडेबोल

Maharashtra Today

मुंबई :- देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची लस (Corona Vaccine) केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) निमित्ताने विधान भवन येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत राज्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली.राज्यातील सर्वांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.   

लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला आहे. तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडे अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या येथील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोना बधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. तर मुंबईमध्ये नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आजच्या घडीला बेडस् उपलब्ध आहेत. ही परिस्थिती आशादायक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागून हे अधिकारी वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन निर्मिती कशी करता येईल, याचा आढावा घेत होते. अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांटस उभे राहत आहेत. जेणेकरून कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह, लसीकरणाबद्दल मात्र संभ्रम कायम?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button