ठेवीदारांनी साधला गुडी पाडव्याचा मुहूर्त

Depositor deposited in the bank on Gudi Padwa at Kolhapur

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. मात्र, ठेवीदारांनी गुडी पाडव्याचा मुहूर्त साधत बँकेत ठेवी जमा केल्या. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १९१ शाखांत सुमारे आठ कोटी ठेवी बुधवारी दिवसभरात जमा झाल्या. तर अंदाजे १५ कोटी रुपयांच्या ठेवी सरकारी व इतर बँकांत ठेवीदारांनी ठेवल्या. ऑनलाईन पध्दतीनेही मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुडी पाडव्यावर यंदा कोरोना विषाणूचे सावट होते. बाजारातील इतर उलाढाल मंदावल्याचे चित्र होते. तर दुसऱ्या बाजूला ठेवीदारांनी हा मुहूर्त साधत ठेवी जमा केल्या. यामध्ये पाच हजारांपासून एक लाख रुपयांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखा ठेवीदारांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. सरकारी बँकेत मार्च एंडींगची घाई सुरू असूनही ठेवीदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. काही बँकांनी मार्च एंडींगची कामे आणि कोरोना यामुळे सुट्टी घेतली. बँकांच्या वेळाही कमी करण्यात आल्या आहेत. कोरोनामाचा मोठा परिणाम बँकांच्या व्यवहारवर होत आहे.

तरीही कोल्हापुरातील खासकरुन ग्रामीण भागातील लोकांनी जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या. मागील वर्षी सुमारे दहा कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या होत्या. यंदा आठ कोटी जमा झाल्याची माहिती बँकेचे सीईओ डॉ. ए. बी. माने यांनी दिली. राष्ट्रीयकृत बँकातही ठेवी जमा झाल्या मात्र मागील वर्षीपेक्षा त्याचे प्रमाण खूपच कमी होते.

ऑनलाईन पध्दतीने लोकांनी मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्याने याचा नेमका आकडा स्पष्ट झाला नाही. पोष्टात रिकरिंग खातेही अनेकांनी या मुहूर्तावर सुरू केले.