शहरातील तीन हजारांहून अधिक घरात डेंग्यूचा डंख

Dengue

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूचा थैमान सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल १०२३ डेंग्यू किंवा सदृश आजराचे रुग्ण आढळले आहेत. महिनाभरात महापालिकेने घर टू घर सर्वेक्षण सुरू असले तरी २५ हजार ९११ लोकांत तब्बल ५५ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. प्रामुख्याने गोड्यापाण्यात होणाऱ्या एडीस डासांपासून डेंग्यू होत असल्याने याबाबत नागरिकांत प्रबोधन करण्याची गरज आहे. बचाव हाच डेंग्यूपासून उपाय असल्याने वातावरणात बदलानंतर नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होईल, या आशेवर यंत्रणा आहे. शहरातील किमान तीन हजारांहून अधिक घरात डेंग्यूच्या एडीस डासाने डंख मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

साथीच्या रोगांना अटकाव करण्यास महापालिकेसह जिल्हा आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात दुषीत पाण्यापासून होणाऱ्या आजारांनी डोके वर काढले आहे. तर शहरी भागात डेंगी व अन्य साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जानेवारी महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात किमान नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील रुग्णांचा समावेश आहे.

कचरा उठावासह प्रक्रियेची क्षमता वाढणार कधी?

डेंग्यू आटोक्यात आल्याचा दावा केला जात असला तरी रुग्ण दगावत आहेत. सोमवारी परितारिका असलेल्या अर्चना लोकरे यांचा डेंग्यूने बळी गेला. शहरात गेल्या काही महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा पाहता विळखा घट्ट होत असल्याचे दर्शविते.

जानेवारीपासून शहरात डेंगीसदृश रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये किरकोळ रुग्ण आढळले. मे महिन्यामध्ये अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्यानंतर महापालिकेने शहरात डेंग्यू प्रतिबंधक व प्रबोधनासाठी मोहीम हाती घेतली. घरात पाच दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवलेल्या पाण्यात एडीस डासांच्या अळ्या तयार होतात. हा डास दिवसा चावतो. सुरुवातीस सर्वसामान्य ताप-खोकल्याची लक्षणे रुग्णामध्ये आढळतात. हाच ताप आठवडाभर रुग्णामध्ये राहिल्यानंतर व तपासणी केल्यानंतर डेंगीसदृश रुग्ण असल्याचे निष्पन्न होते.

विशेषत: डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. तापाच्या रुग्णांची तपासणी, पाणीसाठे, फ्रीज, कचार कंटेनर, रुग्णांची रक्त तपासणी केली जाते. त्याचबरोबर औषध फवारणी होते. प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याने नागरिकांचे प्रबोधन करण्याबरोबरच भित्तीपत्रके वाटण्यात आली. काही ठिकाणी घरात फ्रिज कोणता आहे. पाणी साठते काय? कोणाला ताप आलाय काय? अशा प्रकारचे कागदी घोडी नाचविणारे सर्वेक्षण केल्याची तक्रार आहे. नागरिकांची अनास्था आणि महापालिका यंत्रणेच्या अपयशामुळेच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.