कोल्हापूर शहरात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन

कोल्हापूर :- डोक्यावर तिरंगी टोप्या, खांद्यावर उपरण आणि हातात कॉंग्रेसचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते, ढोल ताशांचा गजर, काँग्रेसचा जयघोष अशा उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापुरातील व्यापार उद्योग वाढीसह बेरोजगारीचा प्रश्न आपल्या अजेंड्यावर असेल, अशी जाधव यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, महापौर माधवी गवंडी, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष आर. के. पोवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, बाजीराव खाडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या उपस्थितीत उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे अर्ज दाखल केला.

ही बातमी पण वाचा : सोशल मिडीयावर निवडणुक प्रचाराचे घुमशान

दरम्यान, सकाळी अकरा वाजता दसरा चौकातील मैदानावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजग, व्यापारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी जमले होते. मान्यवरांनी दसरा चाैकातील शाहु महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर दसरा चौक, खानविलकर पेट्रोलपंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मिरवणुक काढली. यावेळी नगरसेवक, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.