सीमाभागातील गावांचा तेलंगगणात समावेश करण्याची शेतक-यांची मागणी

नांदेड : सीमा भागातील या गावातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याने जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील सीमा भागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी येथील गावांचा समावेश तेलंगणा राज्यात करण्याची मागणी केली आहे.

तेलंगणामधील के.चंद्रशेखर राव सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना तयार केल्या आहेत. या योजनेतून शेतकऱ्याला प्रत्येक हेक्टरसाठी वर्षाला 8 हजार रुपये दिले जातात. महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. जर या गावांचा समावेश तेलंगणा राज्यात झाला तर त्या योजनांचा फायदा आम्हाला देखील घेता येईल, असे येथील लोकांना वाटते.

केसीआर सरकार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला 24 तास मोफत वीज दिली जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा 5 लाख रुपयांचा विमा सरकारने उतरवला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ केले आहे.

धनाबाद तालुक्यातील सरपंच असोशिएशनचे अध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी देखील येथील गावांचा समावेश तेलंगणामध्ये करावा अशी मागणी केली आहे. तर तालुक्यातील बबली गावाच्या सरपंचांनी टीआरएसच्या खासदार कविता यांची भेट घेऊन या गावांचा समावेश तेलंगणा राज्यात करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे खासदार कविता जेव्हा निझामाबाद येथे शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे वाटप कर होत्या तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आमचा समावेश तेलंगणा राज्यात करा अशी मागणी केली.