हळदीची मागणी ७५ टक्क्यांनी घटली

Turmeric

सांगली : करोना (Corona) संसर्गामुळे सांगलीच्या हळद (Turmeric) बाजाराला मोठा फटका बसला. लॉकडाउनमुळे बंद राहिलेले हॉटेल्स, उद्योगधंदे आणि निर्यातबंदीमुळे हळद बाजारातील उलाढाल ७५ टक्क्यांनी घटली. दरातही कमालीची घट झाली. गेल्या पाच महिन्यात मागणीअभावी अवघी दोन लाख वीस हजार क्विंटल हळदीची विक्री झाल्याने शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत.

देशात दरवर्षी सुमारे एक कोटी क्विंटल हळदीचे उत्पादन होते. या हळदीच्या खरेदी-विक्रीचे सर्वात मोठे मार्केट सांगलीत आहे. सांगलीत हळदीला चांगल्या दराची परंपरा असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणातील शेतकरी हळदीच्या विक्रीसाठी येतात. लिलाव पद्धतीने विक्री केल्यानंतर शेतक-यांना हळदीच्या (हळकुंडे) गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल तीन ते नऊ हजार रुपये दर मिळतो. यंदा मात्र करोना संसर्गामुळे हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांचे नियोजन कोलमडले.

लॉकडाउनमध्ये (Lockdown) हळदीचे सौदे बंद झाले. प्रत्यक्ष लिलाव पद्धतीने होणा-या सौद्यांसाठी गर्दी होत असल्याने सांगलीच्या जिल्हाधिका-यांनी ऑनलाइन लिलाव पद्धत सुरू केली. मात्र, वाहतुकीची गैरसोय असल्याने बाहेरचे शेतकरी येऊ शकले नाहीत. हॉटेल्स आणि उद्योगधंदे बंद राहिल्याने मागणीतही कमालीची घट झाली. गेल्यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सव्वासहा लाख क्विंटल हळदीची विक्री झाली होती. यंदा याच चार महिन्यात केवळ दोन लाख २० हजार क्विंटल हळदीची विक्री झाली. विशेष म्हणजे यातील दोन लाख २ हजार क्विंटल हळदीची विक्री मे महिन्यात झाली. उर्वरित तीन महिन्यांमध्ये केवळ आठ हजार क्विंटल हळदीची विक्री झाली. बाजार पूर्णतःच थंडावल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचेही आर्थिक नियोजन कोलमडले आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये नव्या हंगामास सुरुवात होणार आहे. नवीन हळद बाजारात येताच दर उतरण्याचा धोका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER