राज्यव्यापी सर्वसमावेशक बांधकाम नियमावलीची मागणी

राजीव परीख

पुणे : राज्यव्यापी सर्वसमावेशक बांधकाम नियमावलीची (युनिफाईड डीसीपीआर) मंजुरी व शासन, महापालिकेकडे भरावयाच्या विविध प्रीमियमसाठी हप्त्यांच्या सुविधेबाबत राज्य शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रीडाई महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष राजीव परीख व सचीव सुनील कोतवाल यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या स्टॅम्प ड्युटी कमी करावयाच्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे राज्यभर रहिवासी व व्यापारी गाळ्यांच्या खरेदीचा उत्साह वाढलेला दिसून येत आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून चालू वर्षअखेरपर्यंत राज्यभर स्टॅम्प ड्युटी सहा टक्क्यांवरून कमी करून 3 टक्के, तर त्यापुढील मार्च 2021 पर्यंत 4 टक्के इतकी करण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत असून हा निर्णय बांधकाम व्यवसायास नक्‍कीच उभारी देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्णयामुळे राज्यभर सप्टेंबर महिन्यामध्ये मुद्रांक खात्याकडे घर नोंदणीने उच्चांक गाठला असून शासनासदेखील चांगला महसूल गोळा होत असल्याचे चित्र दिसत आहे.

आगामी सणासुदीच्या काळात यात आणखी भर पडेल. याचबरोबर चालू वर्षाचा रेडिरेकनर नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये देखील बांधकाम व्यवसायाच्या सद्यस्थितीचा विचार करून फारशी दरवाढ केली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व बाबींचा क्रीडाई महाराष्ट्रकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालू होता.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बांधकाम व्यवसायाला नोटाबंदी, रेरा कायदा, बेनामी कायदा, जीएसटी बाबतचे बदलते धोरण तसेच बांधकामाबाबतचे वारंवार बदललेले नियम यामुळे अस्थिरतेचे व मंदीचे वातावरण दिसून येत होते. त्यातच मार्चपासून कोव्हिडमुळे बांधकाम मजुरांचे स्थलांतर, साहित्याची कृत्रिम दरवाढ व गिर्‍हाईकांनी गुंतवणुकीकडे फिरवलेली पाठ यामुळे व्यवसायाचे कंबरडेच मोडले होते. आता मात्र स्टॅम्प ड्युटीमधील कपात, मजुरांची वापसी, रेडिरेकनरमधील मर्यादित वाढ व त्याचबरोबर कोव्हिडमुळे लोकांना स्वतःच्या घराबद्दलचे वाढते आकर्षण यामुळे या महिन्यात छोट्या-मोठ्या सर्वच शहरांमध्ये घरांबद्दलची मागणी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाकडे राज्यव्यापी सर्वसमावेशक बांधकाम नियमावलीची मंजुरी व शासन महापालिकेकडे भरावयाच्या विविध प्रीमियमसाठी हप्त्यांची सुविधा हे विषय प्रलंबित आहेत. शासनाने याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी बांधकाम व्यावसायिकांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER