वाझेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करण्याची मागणी

Maharashtra Today

मुंबई : मनसुख हिरेन(Masukh Hiren) मृत्यू प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त सचिन वाझे यांची एनआयएने जब्बल १३ तासांची झाडाझडती केल्यानंतर त्यांना अटक केली. वाझेंच्या अटकेनंतर आता भाजप अधिकच आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टी करण्याची मागणी उचलून धरली आहे. सचिन वाझेला अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनाही जाब द्यावाच लागेल, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यासंदर्भात आज ट्विट करुन भाष्य केले. सचिन वाझे हे शिवसेनेचे प्रवक्ते होते. त्यामुळे आता ओसामा सचिन वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुठले पावले उचलणार, हे आता बघावे लागेल. याप्रकरणात आणखी काही गोष्टी लवकरच समोर येतील.

दरम्यान, सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. एनआयएच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या संपूर्ण कटात सचिन वाझे यांच्यासह पाच ते सात जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाण्यातून आणखी काही जणांना लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी ते अनेकवेळा आयुक्त परमबीर सिंह यांना भेटले होते. या दोघांत दीर्घकाळ चर्चाही झाली होती. तर विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी फेटाळून लावली होती. त्यांनी केवळ सचिन वाझे यांची बदली केली होती. त्यामुळे विरोधक प्रचंड संतापले होते. दरम्यान, एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझे यांना NIA कडून अटक, अंबानी घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार प्रकरणात अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER