बुमरा-बोल्टला निपटले तरच यश दिल्लीच्या आवाक्यात

Trent Boult - Jasprit Bumrah - Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे (IPL) विजेतेपद पटकावले आहे पण चारही एक-एक वर्षाआड आणि फक्त विषम संख्येच्या वर्षी! आता पहिल्यांदाच लागोपाठ दुसऱ्या वर्षी आणि सम संख्येच्या वर्षी जिंकून ते या विचित्र योगायोगाची मालिका खंडीत करतील का? की पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचलेला दिल्ली कॕपिटल्सचा (Delhi Capitals) संघ फायनलच्या पदार्पणातच यशस्वी होईल आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा या स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा यशस्वी कर्णधार ठरेल? याचा फैसला आज दुबईत (Dubai) होईल.

मुंबईने दिल्लीला यंदाच्या तिन्ही सामन्यात आणि गेल्या सलग चार सामन्यात मात दिलेली आहे पण अंतीम सामन्यात ही मालिका खंडीत होऊ शकते असे दिल्ली कॕपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पोंटिंग (Ricky Ponting) यांनी म्हटले आहे. दिल्लीची मदार त्यांचे मॕच विनर ठरलेले शिखर धवन, कसिगो रबाडा व मार्कस् स्टोईनीस यांच्यावर असेल. शिवाय धवनला सर्वाधिक धावा करुन आॕरेंज कॕप जिंकण्याची संधी असेल. अजूनही किंग्ज इलेव्हन पंजाबचा के.एल. राहुल त्याच्यापेक्षा 67 धावांनी पुढे आहे. गोलंदाजांमध्ये रबाडा आघाडीवरच आहे. स्टोईनीसने मागच्या सामन्यात हैदराबादविरुध्द तीन बळी घेण्यासोबतच 38 धावा करण्याची अष्टपैलू कामगिरी केली आहे. यांच्यासोबत रविचंद्रन आश्विन व आॕनरिच नोर्जे यांच्यामुळे गोलंदाजीत दिल्ली भक्कम आहे.

दुसरीकडे मुंबई पलटन अनुभवाच्या बाबतीत वरचढ आहे. सहाव्यांदा ते अंतिम सामना खेळणार आहेत. अंतिम सामना जिंकणे त्यांना नवीन नाही पण सम वर्षी विजेतेपद ही नवीन गोष्ट असेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांनी दिल्लीला मात दिलेलीच आहे. त्या सामन्यात क्विंटन डी काॕक, सूर्यकुमार यादव, इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी दिल्लीच्या भक्कम गोलंदाजांना बदडले होते आणि नंतर दिल्लीने 3 बाद शून्य अशी आयपीएलच्या इतिहासातील सार्वात खराब सुरुवात केली होती. जसप्रीत बुमरा व ट्रेंट बोल्ट यांना खेळून काढणे किती अवघड आहे हे तेंव्हा सर्वांनी पाहिले होते. आता दिल्लीचे फलंदाज या दोघांना कसे निपटतात त्यावरच दिल्लीचे यश-अपयश अवलंबून राहणार आहे.

मुंबईच्या यादव, डी कॉक, किशन या तिघांनीही 450 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे म्हणजे हे तिघे फाॕर्मात आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या व किरोन पोलार्ड आहेत. आणि रोहीत शर्मासुध्दा आहे हे विसरुन चालणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER