दिल्ली हिंसाचार : ‘आयबी’ अधिकाऱ्याचे शव नाल्यात आढळले

The body of 'IB' officer found in drain

नवी दिल्ली : दिल्लीमधील गुप्तचर विभागातील बेपत्ता कर्मचारी अंकित शर्मा यांचे शव आज दंगलग्रस्त चांदबाग परिसरात नाल्यात सापडले. दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारात ठार झालेल्या चार जणांचे प्रेत आज सकाळपासून सापडले आहेत.

अंकित बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी केली होती. अंकित यांचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी आधी खजुरी पोलिस ठाण्यात गेले होते; मात्र नंतर त्यांनी दयालपूर पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवली. अंकित चांदबाद परिसरात राहात होते. चांदबाग पुलया भागातील एका नाल्यातून अंकित यांचा मृतदेह काल संध्याकाळी बाहेर काढण्यात आला, असे कळते.

डोक्यावर तलवारीचे वार
अंकित यांच्या डोक्यावर तलवारीच्या वाराच्या खुणा आढळल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या शरीरावर चाकूहल्ल्याचेही वार आढळले आहेत, असे कळते. अंकित यांचा मृतदेह नाल्यामध्ये दगडाखाली दाबून ठेवला होता.

दरम्यान, दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर आणि चांदबागेत सुरू असलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. या हिंसाचारात सुमारे २०० लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारात याआधी दिल्ली पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल रतनलाल याला गमावले आहे.