दिल्ली हिंसाचारप्रकरण : काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन; राजधर्माचे पालन झाले नसल्याचा आरोप

नवी दिल्ली :- दिल्ली हिंसाचारप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. दिल्लीत सरकारकडून राजधर्माचं पालन झालं नसल्याचा गंभीर आरोप सोनिया गांधी यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारवर केला आहे. दिल्लीत हिंसाचार सुरू असताना केंद्र आणि दिल्ली सरकार मूकदर्शक बनली.

हिंसा सुरू असताना सरकारकडून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी पत्रकारांशी बोलत होत्या. राष्ट्रपती कोविंद यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमित शहांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. तसेच, ‘नागरिकांचं जीवन, संपत्ती आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात यावं. यासाठी तुम्ही निर्णायक पाऊल उचलाल.’ अशी मागणी सोनिया गांधी यांनी निवेदनातून केली आहे.

सांगली महापालिकेचा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायीसमोर सादर

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं की, ‘काही दिवसांपासून जे दिल्लीमध्ये घडत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. तसेच देशासाठी लाजिरवाणी घटना आहे. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी असक्षम ठरणं म्हणजे, केंद्र सरकारचं अपयश आहे.’ पुढे ते म्हणाले की, ‘राष्ट्रपतींना आम्ही विनंती केली आहे की, त्यांनी सरकारला राजधर्माचं पालन करण्यासाठी सांगावं.’