… तर १५ जानेवारीपासून ‘छपाक’ चित्रपटाचे प्रदर्शन बंद ; न्यायालयाचे आदेश

delhi-hc-give-credit-to-acid-attack-victims-lawyer-Lakshmi Agarwal chhapaak movie

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा प्रदर्शनानंतरही ‘छपाक’ चित्रपटाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकील अपर्णा भट्ट यांना ‘छपाक’ चित्रपटात क्रेडिट न दिल्यास १५ जानेवारीनंतर प्रदर्शन रोखण्यात येईल, असा अल्टिमेटम दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

अपर्णा भट्ट यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. आज यावर सुनावणी करत न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली. पीडित लक्ष्मी अग्रवालच्या संपूर्ण न्यायालयीन लढाईत अपर्णा भट्ट यांनी तिला साथ देत न्याय मिळवून दिला होता. मात्र चित्रपटात आपल्याला क्रेडिट न दिल्यामुळे प्रदर्शन थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यामुळे वकिलाच्या नावाचा समावेश करून चित्रपटाच्या क्रेडिट लिस्टमध्ये १५ जानेवारीपर्यंत बदल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आपण अनेक वर्षे लक्ष्मी अग्रवाल यांच्या बाजूनं न्यायालयात खटला लढला आहे. चित्रपट तयार करताना स्क्रिप्ट तयार करण्यातही मदत केली होती. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचं श्रेय देण्यात आलं नाही, असं भट्ट यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत आपण मेघना गुलझार यांच्या संपर्कात होतो. चित्रपट प्रदर्शित होताना त्यांना श्रेय दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु ७ जानेवारी रोजी चित्रपटाच्या प्रमिअरदरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचं श्रेय दिलं नसल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

‘छपाक’साठी दीपिका पदुकोण सिद्धिविनायकाच्या चरणी