दिल्ली बॉम्बस्फोट : जैश उल हिंद संघटनेने स्वीकारली जबाबदारी

Blast near Israel Embassy in Delhi

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) शुक्रवारी इस्रायली दूतावासाबाहेर (Israel Embassy) झालेल्या स्फोटाच्या तपासाची चक्र फिरली आणि आता या स्फोटामागचे एक एक धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांची (Delhi Police) स्पेशल सेल, क्राईम ब्रँच आणि एनआयए (NIA) या तीन संरक्षण – तपास यंत्रणांकडून सदर प्रकरणाच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आता या हल्ल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आली आहे. दिल्ली हल्ल्याची जबाबदारी घेणारी ही संघटना आहे जैश उल हिंद.

केंद्रीय तपास यंत्रणांना संशयित चॅनलची टेलिग्रामवर एक चॅट मिळाली आहे, ज्यात जैश उल हिंदने दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चॅटमध्ये दहशतवादी संघटना हल्ल्यावर अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, यंत्रणांकडून जैश उल हिंदकडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे. परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींचे स्केच तयार केले जात आहे. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं असून, यात एक लिफाफा सापडला. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती. त्यामुळं आता तपास जसजसा पुढे जात आहे तसतशी या हल्ल्याची पाळंमुळं उघडी पडत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER