लॉकडाऊन हटवा नाही तर रस्त्यावर उतरू; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

VBA - Akola Lockdown

अकोला : वाढत्या कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही नियमावली जारी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. अकोला (Akola) जिल्ह्यातही लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. अकोल्यातील लॉकडाऊन हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे  शोषण होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे गुरुवारपासून लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि अकोटमध्ये गेल्या १० दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे.

नागरिकांनी रुग्णालयातच उपचार घ्यावे

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरी व ग्रामीण भागांत सातत्याने वाढत आहे. योग्य उपचार न मिळल्याने मृत्यू होण्याची शक्यता आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या कोविड रुग्णांनी  १० ते १२ दिवस घरी उपचार घेतले. नंतर खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी कोविडची लक्षणे दिसताच स्वतःहून कोविड चाचणी करून घ्यावी आणि ती पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

२४ तासांत ४३१ पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी दोन कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला. एकूण बळींची संख्या ३७४ वर पोहचली आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये ३४४, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ८७ अशा एकूण ४२१ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १७ हजार ४४६ इतकी आहे.

जिल्हा परिषदेची सभा ऑनलाईन

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता बुधवारी जिल्हा परिषदेची सभा ऑनलाईन घेण्यात आली. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन सुरू असताना जिल्हा परिषदेला ऑनलाईनच बंधन का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER