दारूचे दुकान हटवा, मग निवडा सरपंच-उपसरपंच; नांदेडमध्ये महिलांचा ग्रामपंचायतीसमोर ठिय्या

Delete liquor store then select Sarpanch

नांदेड :- आधी गावातले देशी दारूचे दुकान हटवा, मग सरपंच – उपसरपंच निवडा, अशी अट घालत धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात जाऊ दिले नाही.  त्यामुळे नायगाव सरपंच निवडीची सभा तहकूब करून निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. महिलांची तक्रार आहे की गावातील देशी दारूचे दुकान २४ तास सुरू असते. इथे दारू स्वस्त मिळते म्हणून तेलंगणातील लोकही इथे येतात. गावात दारुड्यांचा उच्छाद सतत सुरू असतो. चौथीत शिकणारी कोवळी मुलेही दारू पिऊन गावभर धिंगाणा घालतात!

लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे आज गावातील महिलांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. धर्माबाद पोलीस आणि तहसील प्रशासनाने मध्यस्थी केली. परंतु जोपर्यंत दारूचे दुकान बंद होत नाही तोपर्यंत सरपंच – उपसरपंच निवड होऊ देणार नाही, असे या रणरागिणींनी सांगितले. त्यामुळे आजची सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया तहकूब करून पुढे ढकलावी लागली.

ही बातमी पण वाचा : आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा : हसन मुश्रीफ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER