खातेवाटपाची ‘तारीख पे तारीख’ देणं बरोबर नाही : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप सातत्यानं लांबवलं जात असल्यानं शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘खातेवाटप   काही मोठा गंभीर विषय नाही. त्यासाठी इतका वेळ लागणं चुकीचं आहे. ‘तारीख पे तारीख’ देणं हे काही बरोबर नाही. ’ असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेने ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘खातेवाटपाला उशीर होतोय हे खरं आहे. हे असं का होतंय काही कळायला मार्ग नाही. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील. अलीकडच चार ते पाच तास मॅरेथॉन बैठका झाल्या. खरं तर हा अर्ध्या तासाचा विषय आहे. तरीही उशीर का होतोय कळत नाही. ’ असं राऊत म्हणाले.

पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडं बोट दाखवलं. ‘सत्तारांनी राजीनामा का दिला, मला माहीत नाही.’ असं ते म्हणाले.

तसेच माजी मंत्री दीपक सावंत यांनी शिवबंधन तोडण्याचा इशारा दिल्याबद्दलही राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘दीपक सावंत काही दिवसांपूर्वी मला भेटून गेले. त्यांनी त्यांची व्यथाही मांडली. त्यांची व्यथा पक्षप्रमुखांना कळवण्याचं आश्वासन मी त्यांना दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्री सध्या कामात आहेत. लवकरच मी त्यांच्याशी चर्चा करेन.’ असंही त्यांनी सांगितलं.