अमेरिका व भारतात उद्या संरक्षण करार,3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र मिळणार

Donald Trump-PM Modi

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतभेटीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत 3 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराची घोषणा केली. भारत आणि अमेरिकेतील हा सर्वात मोठा संरक्षण करार असून अमेरिका भारताला 3 अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार आहे. उद्या नवी दिल्लीतील या करारावर स्वाक्ष-या होणार आहेत. तर व्यापार कराराचेही संकेत ट्रम्प यांनी दिलेत. मात्र त्यावर अजूनही वाटाघाटी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इथल्या मोटेरा स्टेडियममध्ये दीड लाख लोकांसमोर भाषण दिले. 22 किलोमीटरचा रोड शो आणि साबरमती आश्रमातल्या भेटीनंतर ट्रम्प हे पत्नी मेलेनियासह स्टेडियमवर पोहोचले. तिथे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत संरक्षण कराराची घोषणा केली.

दहशतवाद आवरा; ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले. मोदी हे वाटाघाटीत अतिशय कठोर आहेत. ते आपली भूमिका सोडत नाहीत असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्र अमेरिका भारताला देणार आहेत. दोन्ही देशांमधला हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे.

भारत गेली अनेक दशकं रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसोबत भारताचे संरक्षण सहकार्य वाढत आहे. भारत अमेरिकेच्या वस्तुंवर जास्त कर लावतो. मात्र अमेरिका भारताता कमी करांमध्ये वस्तू देतो. आता भारतानेही अमेरिकेच्या आयात वस्तूंवरचे कर कमी करावेत अशी अमेरिकेची मागणी आहे.