अखेर कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल; अब्रुनुकसानीचा खटला चालणार

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (kangana-ranaut) हिने मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य केले होते.

मुंबई पोलिसांवर आरोप, मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा, तर मुख्यमंत्र्यांचा थेट एकेरी शब्दांत उल्लेख, यावरून कंगनाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर कंगनाविरुद्ध शिवसेना असा संघर्ष चांगलाच पेटला. शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना असे द्वंद्व युद्ध सुरू झाले. त्यातच मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान कंगनाने दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली येथील कार्यालयाची चौकशी केली व अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस बजावली. त्यानंतर २४ तासांनंतर मनपाने कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवला. यामुळे कंगनाचा संताप अधिकच वाढला व तिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला. मात्र, जरी मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता असली तरी कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात शिवसेनेची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मनपा विभागाने त्यांचे अधिकाराखाली ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी, वकील नितीन माने यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाचा पाली हिल येथील बंगल्याचं बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना कंगनाने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांची बदनामी केली. या प्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रुनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याचं नितीन माने यांनी म्हटलं आहे. कंगना रणौत मुंबईत घरी पोहचताच तिने एक व्हिडीओ अपलोड केला. त्यात तिने मुख्यमंत्री उद्धव टाकरेंचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करत ‘तुमने जो किया अच्छा किया. उद्धव ठाकरे आज मेरा घर टूटा, कल तेरा घमंड टूटेगा.’ असे कंगनाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER