माफी मागा, अन्यथा… रवींद्र वायकर यांच्याकडून सोमय्यांना मानहानीची नोटीस

Maharashtra Today

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांच्यावर कोर्लाई व महाकाली येथे जमीन खरेदी केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणी वायकर यांनी सोमय्या (Kirit Somaiya) यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. माफी मागा, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा, असा इशारा रवींद्र वायकर यांनी सोमय्या यांना नोटिसीतून दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच याची माहिती निवडणूक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे, या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी (एका बंगल्याची किंमत रुपये पाच कोटी आहे.) केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.

परंतु आरोप करताना त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नव्हते. त्याचबरोबर महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले व शाहिद बलवा यांच्याकडून रुपये २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांचे हे सर्व आरोप खोटे असून माझ्या कुटुंबासह पक्षाची नाहक बदनामी केली आहे, असं वायकर यांनी म्हटलं आहे. यातील कोर्लाई जमीन प्रकरणी सोमय्या यांच्या आरोपांची काही विविध प्रसारमाध्यमांनीच पोलखोल केली. परंतु मार्च महिन्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी पुन्हा माझ्यावर खोटे आरोप करून माझी जाणूनबुजून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असं सांगत या प्रकरणी मी सोमय्यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटिसीत सोमय्या यांनी कुठलेही सबळ पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आरोप मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे, असा इशाराही वायकर यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER