दीपिका पदुकोण ‘जेएनयू’त विद्यार्थ्यांच्या भेटीला

नवी दिल्ली : जेएनयूच्या आंदोलनात आज मंगळवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सहभागी झाली. दीपिका पदुकोण तिच्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आली असताना तिने जेएनयू कॅम्पसच्या बाहेर जमलेल्या विद्यार्थ्यांची आज भेट घेतली.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांकडून याविरोधात निदर्शने सुरू आहेत. राजधानी दिल्लीतील वातावरण प्रचंड तापले असून, त्यातच दीपिकाने रविवारच्या हल्ल्यात जखमी झालेली ‘जेएनयूएसयू’ची अध्यक्ष आइशी घोष हिचीही भेट घेतली. यानंतर दीपिका पदुकोण काही वेळ विद्यार्थ्यांसोबत थांबली. यावेळी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारही उपस्थित होता. त्याने यावेळी घोषणा दिल्यात. आज दिवसभरात अनुराग कश्यप, अनुराग बसू, तापसी पन्नू, गौहर खान, दिया मिर्झा, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, राहुल बोस, रिचा चढ्ढा, अली फजलसह अनेक कलाकारांनी ‘जेएनयू’त हजेरी लावली.