
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज बॉलिवुडमधील (Bollywood) सगळ्यात यशस्वी नायिका असून ती निर्मातीही झाली आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित सिनेमा 83 ची ती सहनिर्माती आहे. फक्त 13 वर्षात दीपिकाने हे यश मिळवले आहे. मात्र पहिल्या सिनेमाच्या वेळी तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. मात्र त्या टिकेकडे दुर्लक्ष करीत काम राहिल्याने यश मिळवले असे स्वतः दीपिकानेच एका मुलाखतीत सांगितले.
दिग्दर्शिका फरहा खानने जेव्हा शाहरुख खानसोबत ‘ओम शांति ओम’ची (Om Shanti Om)सुरुवात केली तेव्हा ती नव्या नायिकेच्या शोधात होती. दीपिका तोपर्यंत मॉडेल म्हणून यश मिळवू लागली होती. शाहरुखसोबत अत्यंत महत्वाची आणि मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी फरहाने दीपिकाला साईन केले. दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाबाबत बोलताना दीपिकाने सांगितले, हा सिनेमा साईन केला तेव्हा माझे वय 19 वर्षांचे होते. सिनेमा क्षेत्राबाबत मला काहीही माहिती नव्हते. मी एकदम कच्ची होते. परंतु सेटवर आल्यानंतर शाहरुख खान आणि फरहा खानने मला हाताला धरून प्रत्येक गोष्ट शिकवली. या दरम्यान काही चांगल्या गोष्टी जशा झाल्या तसेच अशाही काही गोष्टी झाल्या ज्याचा मला खूप त्रास झाला. मला अनेकांच्या टीकेचे धनीही व्हावे लागले होते. एक ग्रुप असाही होता जो माझ्यावर सतत टीका करीत होता. मी एक मॉडेल आहे, मला अभिनय करता येणार नाही असे ते म्हणत असत. माझ्या बोलण्याच्या स्टाईलवरही टीका केली जात होती. माझ्याविरोधात खूप काही बोलले आणि लिहिले गेले होते. ते वाचून आणि ऐकून मला खूप त्रास झाला होता. तुम्ही जेव्हा तरुण असता आणि तुमच्यावर जेव्हा अशी टीका केली जाते तेव्हा त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. हा सर्व त्रास मी सहन केला. त्यांच्या टीकेला न घाबरता आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी माझे काम करीत राहिली, मला अपयशही आले पण मी अपयशाने शिकत गेले आणि त्यामुळेच मला यश मिळाले असेही दीपिकाने या मुलाखतीत सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला