दीपिकालाही लागले हॉलिवूडचे वेध, सगळ्यात मोठ्या टॅलेंट एजन्सीबरोबर केला करार

Deepika Padukone

हॉलिवूडमध्ये (Hollywood) काम करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या कलाकारांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे. भारतात हॉलिवूडचे सिनेमे हिट होत असल्याने बॉलिवूडमधील कलाकारांना हॉलिवूडचे (Hollywood) निर्माते कामही देऊ लागले आहेत. हॉलिवूडवाले फक्त बिझनेस बघतात त्यामुळे बॉलिवूडच्या कलाकारांना नावाला छोटी मोटी भूमिका देत असत. मात्र इरफान खान, गुलशन ग्रोव्हर, कबीर बेदी, अमरीश पुरी यांनी स्वतःची एक वेगळी इमेज तयार केलेली असल्याने त्यांना हॉलिवूडचे निर्माते चांगल्या भूमिका देत असत. बॉलिवूड कलाकारांना योग्य स्थान हॉलिवूडवाले देत नसल्याने अमिताभ बच्चन यांनी हॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या सुनेने ऐश्वर्याने मात्र काही हॉलिवूडपट केले ज्यात तिला काहीही काम नव्हते. प्रियांका आता हॉलिवूडमध्ये असली तरी तिचा असा एकही सिनेमा नाही ज्याबाबत चांगले बोलता येईल. तिचा नुकताच रिलीज झालेला ‘वुई कॅन बी हीरोज’ सिनेमा तिने का केला असा प्रश्न सिनेमा पाहिल्यावर पडला. दीपिकानेही काही वर्षांपूर्वी सुपरस्टार व्हॅन डिझेलसोबत ‘xXx: रिटर्न ऑफ जेंडर केज’ मध्ये काम करून हॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता दीपिकाने हॉलिवूडवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे असे दिसते. दीपिकाने हॉलिवूडमधील एका मोठी टॅलेंट एजन्सीबरोबर कामासाठी करार केला आहे.

आयसीएम असे या टॅलन्ट एजन्सीचे नाव असून या एजन्सीकडे हॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आहेत. रेसलर आणि सिने अभिनेता जॉन सीना, द व्हम्पायर डायरीज फेम इयान समहाल्डर आणि ऑल द बॉयज आय हॅव लव्हड बिफोर फेम स्टार लाना कॉन्डोर हे या एजन्सीचे क्लायंट आहेत. या एजन्सीचे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि लंडनमध्ये ऑफिसेस असून जगातील ही एक सगळ्यात मोठी टॅलेंट एजन्सी असल्याचे म्हटले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकाने या एजन्सीशी करार केला असून आता ही एजन्सी हॉलिवुडमध्ये दीपिकाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या एजन्सीसोबतच अमेरिकेतील अॅलन सेगल एंटरटेनमेंटचे डॅनियल रॉबिन्सनही दीपिकाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

बॉलिवूडमध्ये काम करता करता दीपिकाला हॉलिवूडचे वेध लागले यात काहीही चूक नाही. पण हिंदी सिनेमात जशा भूमिका मिळतात तशा भूमिका तिला हॉलिवूडमध्ये कोणी देईल असे वाटत नाही. याचे कारण हॉलिवूडमधील सिनेमात नायिकांना अंग प्रदर्शनासह प्रणयाचीही दृश्ये द्यावी लागतात. तेथील नायिकांना यात वावगे वाटत नाही, असे असताना दीपिका अशा भूमिका करू शकेल का असा प्रश्न यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER