दीपालीने केली एक खास चौकशी

Deepali Syed made a special inquiry on Mansi Naik wedding

अभिनेत्री अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हिचं बहुचर्चित लग्न १९ जानेवारीला पार पडलं. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसीने लग्नगाठ बांधली. पुण्याच्या मानसीने थेट फरीदाबादच्या प्रदीपला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आणि ती लग्नानंतर फरीदाबादला गेली. हा लग्न सोहळा संपला असला तरी अजूनही मानसी आणि प्रदीप यांचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मानसी ही प्रदीप फरेरा (Pradeep Ferreira) बरोबर खूप खूश असल्याचे दिसत आहे; पण या सगळ्या आनंदाच्या मागचं कारण मानसीची जवळची मैत्रीण आणि तिच्यासाठी सगळं काही असलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद (Deepali Syed) आहे.

जेव्हा मानसीने प्रदीप तिच्या आयुष्यात आल्याचं दीपालीला सांगितलं तेव्हा त्याची सगळी खबरबात मिळवण्याचं काम दीपालीनं केलं होतं. दीपालीने प्रदीपची खास चौकशी केली होती. मानसीच्या लग्नमंडपातच अनौपचारिक गप्पांमध्ये दीपालीने ही गोष्ट शेअर केली. दीपालीने जेव्हा प्रदीप खरेरा मानसीसाठी योग्य मुलगा असल्याचं जेव्हा सांगितलं त्यानंतरच मानसीने पुढे पाऊल टाकले. मराठी इंडस्ट्रीमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी असू शकत नाहीत असं अनेकदा बोललं जातं. त्यात एकाच क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या दोघीजणी एकमेकींची नेहमीच उणीदुणी काढत असतात असे अनुभव अनेकदा बघायला मिळतात. पण अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक आणि अभिनेत्री आणि डान्सर दीपाली सय्यद या दोघींची मैत्री खूप घट्ट आहे. खरे तर मानसीच्या खूप आधीपासून दीपाली या क्षेत्रात काम करते. त्यामुळे तिला या क्षेत्रातील खूप अनुभव आहे . मानसी नेहमीच दीपालीचे कौतुक करत असते की, तिने या क्षेत्रातील अनेक चांगल्या गोष्टींसाठी मानसीला नेहमी पाठिंबा दिला आहे. जिथे चुकीच्या गोष्टी घडल्या तेव्हा तिला अडवलं आहे आणि त्यामुळेच मानसी दीपालीला तिची मोठी बहीण आणि गुरू मानते.

यापूर्वी मानसीच्या आयुष्यात अनेक घडामोडी झाल्या होत्या; त्याचीदेखील दीपाली साक्षीदार आहे. मानसीने या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडून तिचं आयुष्य स्थिर करावं, असं दीपालीला नेहमीच वाटत होतं. मानसीने लग्नाचा निर्णय घेतला त्या वेळेला तिने ज्या मुलाची निवड केली होती त्याच्याबद्दलही मानसी आणि दीपालीमध्ये नेहमी चर्चा व्हायची. मात्र जेव्हा दीपालीला त्या मुलामध्ये काही चुकीच्या गोष्टी दिसल्या होत्या तेव्हा मानसीला दीपालीने हे नातं पुढे न नेण्याचा सल्ला दिला होता. मानसीनेदेखील दीपालीचा सल्ला ऐकला होता. साहजिकच जेव्हा मानसीला प्रदीप खरेरा भेटला तेव्हा त्याच्याबद्दल मानसी आणि दीपाली यांच्यामध्ये खूप चर्चा झाली आणि प्रदीपविषयी माहिती घेण्याचे काम दीपालीने स्वतःकडे घेतले. प्रदीप उत्तरप्रदेशमधील फरीदाबादचा रहिवासी असल्यामुळे लग्नानंतर मानसी तिकडे जाणार होती. त्यामुळे त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असल्यामुळे त्याच्या करिअरविषयीची माहिती, त्याचा स्वभाव याची चौकशी मानसीसाठी केली. दीपालीची खात्री पटली की, हा मुलगा मानसीसाठी योग्य आहे त्यानंतरच मानसीच्या लग्नाची गाडी पुढे गेली. दीपाली सांगते, मानसीचा स्वभाव कसा आहे हे मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे.

ती खूप चंचल आहे आणि तिच्या आयुष्यात येणारा जोडीदार हा खूप समजंस, संयमी असणं गरजेचं होतं आणि प्रदीपमध्ये तो संयम , शांतपणा मला दिसला. त्यामुळे मानसीच्या चंचलपणाला आवर घालणारा परंतु तरीदेखील मानसीला तिची स्पेस देणारा असा हा प्रदीप आहे. याचा मला खूप आनंद होतोय की, मानसीला समजून घेणारा मुलगा जोडीदार म्हणून मिळाला. प्रदीप खरेरा याचं लग्न १९ जानेवारीला थाटामाटात पार पडलं. त्यापूर्वी मानसीने लग्नाच्या विधीपासूनचे मेहंदी-हळदी संगीत असे सगळे फोटो शेअर केले होते. शिवाय मानसीच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टी आयोजित केली होती. त्याचेही फोटो मानसीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. आता लग्नानंतर जेव्हा मानसी प्रदीपसोबत पुन्हा मुंबईत येईल तेव्हा दीपालीने या दोघांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER