DFO विनोद शिवकुमारला फाशी द्या, आत्महत्या करणाऱ्या महिला RFO च्या आईची मागणी

Deepali Chavan Sucide case demand Hang DFO Vinod Shivkumar

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरिसाल क्षेत्राच्या RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी काल निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. दिपाली यांनी चार पानी सुसाइड नोट (Suicide note) लिहून DFO विनोद शिवकुमार (DFO Vinod Shivkumar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दीपाली (Deepali Chavan Sucide case) यांच्या आई शांताबाई चव्हाण यांनी शिवकुमार यांना फाशी द्या, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार याने एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, अशी माहिती आहे. विनोद शिवकुमारला नागपूर-बंगळुरू राजधानीमधून फरार होत असताना अटक करण्यात आली आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. मात्र आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अपर मुख्य प्रधान संरक्षक रेड्डी यांच्यावर कारवाई न झाल्याने नातेवाईकांनी दीपालीचे शव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

दीपालीचे पती राजेश मोहिते यांनी सांगितले की, दीपालीने वारंवार वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली होती. याबाबत पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. शिवकुमार दीपालीला शिवीगाळ करत होते, त्रस्त झाल्याने हे पाऊल उचलले.

जोपर्यंत आरोपी आणि त्याला सहकार्य करणारे रेड्डी यांच्यावर कारवाई आणि अटक होत नाही, आम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही दीपालीचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका दिपालीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.

गर्भपातासही कारणीभूत

‘वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे मला गावकरी आणि कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ करतात, रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्यास वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देतात’, असे दिपाली यांनी या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्या कडे तक्रार केली मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही, असाही उल्लेख या सुसाईड नोट मध्ये आहे. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक रेड्डी यांच्या नावाने ही सुसाइड नोट लिहिली आहे.

दीपाली यांनी या सुसाइड नोटमध्ये केलेला आणखी एक गंभीर आरोप म्हणजे,मला शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. मी प्रेग्नंट असल्याने ट्रेक करू शकत नव्हती तरी देखील शिवकुमार यांनी त्यांना ३ दिवस मालुरच्या कच्या रस्त्याने फिरवले. त्यामुळे माझा गर्भपात झाला, असा आरोप दिपाली यांनी शिवकुमार यांच्यावर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER