दिपाली बनली हेल्पिंगबर्ड

Deepali

देणाऱ्याने देत जावे…घेणाऱ्याने घेत जावे…घेणाऱ्याने एकेदिवशी देणाऱ्याचे हात व्हावे हे वाक्य कुणालाही अनोळखी नाही. किंबहुना अनेकजण हे वाक्य आचरणातही आणतात. पण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनासाथीच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले, आर्थिक घडी विस्कटली. अशा परिस्थितीत या वाक्याला खऱ्याअर्थाने अर्थ आला. देणाऱ्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकारही होते. गेल्यावर्षीही जेव्हा पावसाने थैमान घातले होते आणि महापुराचे संकट ओढवले होते तेव्हाही पडद्यावरील कलाकारांनी पडद्यामागच्या कलाकारांना मदतीचा हात दिला होता. यंदाही कलाकार असेच मदतीला धावले आणि त्यात अभिनेत्री दीपाली सय्यद ही देखील हेल्पिंग बर्ड झाली.

काही कलाकार काही ना काही कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकतात. कधी कलाकार काही चुकीचे वक्तव्य करतात तर सोशल मीडियावरून भावनेच्या आणि उत्साहाच्या भरात काहीतरी पोस्ट करून वादात येतात. अशाच कलाकारांमध्ये यापूर्वी दिपालीचेही नाव आले आहे. नंतर माफीच्या पोस्टने सावरलं जातं ही गोष्ट वेगळी. पण सध्या गेल्या दोन महिन्यात दिपाली चर्चेत आली आहे ती कोणत्याही वादामुळे नव्हे तर तिने केलेल्या मदतीमुळे. दिपालीने कुणाला मदत केली या प्रश्नाचे उत्तरही तिने तिच्या सोशलमीडिया पेजवरून जाहीर केले आहे.

दिपाली सांगते, मी स्वत: एक कलाकार आहे. खूप लहान वयातच ती स्टेजवर चढली. नृत्य आणि अभिनय या क्षेत्रात ती आली. मुळची दिपाली भोसले आणि लग्नानंतर सय्यद झालेली दिपालीला तिच्या या दोन आडनावांचेही सातत्याने स्पष्टीकरण द्यावे लागते. मध्यंतरी शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणातही दिपाली उतरली होती. त्यावरूनही दिपाली खूप ट्रोल झाली होती. एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेल्या दिपालीच्या भडक लूकवरूनही तिला तिच्या चाहत्यांनी खूप त्रास दिल्याची चर्चा रंगली होती. एकूणच दिपाली आणि वाद किंवा चर्चा हे समीकरण कायमचेच आहे आणि ते दिपाली नेहमीच हँडल वुईथ केअर पद्धतीने हाताळते.

अर्थात तो तिचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम थांबल्याने ज्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे अशा कलावंतांसाठी दिपालीने आर्थिक तसेच जीवनावश्यक मदतीचा हात दिला आहे. गेल्या दोन महिन्यात, कामावर मानधन असलेल्या पडद्यामागच्या कलाकारांना दिपालीने १५ लाख रूपयांची मदत केली आहे. गेल्या चार महिन्यात कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत. कोणत्याही इव्हेंटमध्ये स्टेजवर परफॉर्म करणारे सेलिब्रिटी टाळ्या घेत असले तरी त्यासाठी कित्येक पडद्यामागचे कलाकार मेहनत घेत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम, सोहळे असतात तेव्हा स्टेज उभारणे, सेट तयार करणे, लाइटमन, नेपथ्य आर्टिस्ट, वादक अशा खूप कलावंतांच्या हातचे कामच थांबले आहे. त्यांच्यासाठी दिपालीने मदतीचा पुढाकार घेतला आहे. अशा कलाकारांची यादी तिने तिच्या परिचित कलाकारांकडून मागवली आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाची किट तयार केली. ही किट प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्यात आली. यामुळे त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न मिटला असल्याने दिपालीवर सध्या आभाराचा वर्षाव होत आहे.

दिपालीच्या वादग्रस्त विधानांच्याच नेहमी बातम्या होतात हे जरी खरे असले तरी यापूर्वीही तिने अनेक संकटकाळात मदत केली आहे. त्यासाठी तिने दिपाली सय्यद मेमोरिअल ट्रस्ट काढला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील रांजणी व कामठी या गावांचे दत्तक पालकत्वही दिपालीने घेतले आहे. कामठी गावात जलसंधारणचे भूमीपूजन करून या गावाला १४ लाख रूपयांची मदत दिली आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा येथील महापूरग्रस्त भागातील एक हजार मुलींच्या लग्नासाठी दिपालीने आर्थिक मदत दिली होती. यासाठी ५ कोटी रूपयांचे साहित्य खरेदी करून दिपालीने पूरग्रस्त मुलींच्या लग्नासाठी दिले होते. बीडमधील महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करणारी दिपाली एक महिनाभर त्या महिलांना आरोग्य, स्वच्छता याबाबत माहिती देत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER