‘मनी लॉन्ड्रिंग’ खटल्यात दीपक कोचर यांना जामीन

Bombay HC - Maharastra Today
  • व्हिडिओकॉन कर्जघोटाळा प्रकरण

मुंबई : व्हिडिओकॉन कंपनीस आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या नियमबाह्य कर्ज घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचलनलयाने (Enforcement Directorate-ED) दाखल केलेल्या ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या खटल्यातील आरोपी दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. दीपक कोचर हे याच खटल्यातील सहआरोपी व आयसीसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्याकारी अधिकारी (MD & CEO) चंदा कोचर यांचे पती आहेत.

न्या. प्रकाश डी. नाईक यांनी दीपक कोचर यांना तीन लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. त्यासाठी पासपोर्ट ‘ईडी’कडे जमा करण्याची अट घालण्यात आली. चंदा कोचर व व्हिडिओकॉन इन्डस्ट्रिजचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनाही याआधी जामीन मिळाला आहे.

जून २००९ ते ऑक्टोबर २०११ या काळात आयसीसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समुहातील कंपन्यांना १,५७५ कोटी रुपयांची नियमबह्य कर्जे दिल्यासंबंधीचा स्वतंत्र खटला केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) दाखल केला आहे. चंदा कोचर यांनी ही नियमबाह्य कर्जे मंजूर करण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला व त्यासाठी दीपक कोचर यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून लांच देण्यात आली असा त्यात आरोप आहे. घतलेली ही कर्जे बुडवून ते पैसे अर्न्य फिरविल्याबद्दल ‘ईडी’ने ‘मनी लॉन्ड्रिंग’चा खटला दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील पैसा फिरविण्यात सहभाग दिल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे. ‘ईडी’ने त्यांच्या मालमत्तांवर हंगामी टाच आणली होती. परंतु ‘पीएमएलए’ कायद्याखालील अपिली प्राधिकरणाने ती कायम करण्यास नकार दिला होता. आपल्याविरुद्धच्या आरोपांत काही दम नाही, असा जामिनासाठी युक्तिवाद करताना दीपक कोचर यांनी अपिली प्राधिकारणाच्या या आदेशाचा दाखला दिला होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER