हनुमान कोळीवाड्याचे नवीन जागेत पुनर्वसनाबाबतचा निर्णय लवकरच – योगेश सागर

Yogesh Sagar

मुंबई : उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाड्याचे नवीन जागेत लवकरच पुनर्वसनाबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

नवी मुंबईतील उरण येथील जेएनपीटीसाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य रमेशदादा पाटील यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. सागर बोलत होते.

श्री. सागर म्हणाले, हनुमान कोळीवाडा गावाचे ज्या जागेमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते, त्या पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी प्रथम 1996 मध्ये पुनर्वसित करण्यात आलेल्या घरांना वाळवी लागल्याचे निर्दशनास आल्याने व त्या ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने, सदर गावठाणाचे अन्य ठिकाणी दुबार पुनर्वसन करण्याची विनंती होत आहे. सदर विनंतीच्या अनुषंगाने विधानमंडळ विनंती अर्ज समितीने दिलेले निर्देश विचारात घेऊन हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट यांनी जमीन उपलब्ध करुन द्यावी. व पुनर्वसनाची कार्यवाही करावी तसेच सध्याची जमीन जेएनपीटीने ताब्यात घेऊन योग्य वापर करावा या सूचना विभागीय आयुक्त, कोकण विभाग, चेअरमन जेएनपीटी व जिल्हाधिकारी, रायगड यांना दि. 8 नोव्हेंबर 2016 च्या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाबाबत केंद्रीय नौकानयन मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल. तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त व लोकप्रतिनिधी यांचीही याबाबत भेट घेतली जाईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

हि बातमी पण वाचा : शरद पवारांसमोर अर्धनग्न आलेला ‘तो’ विधानसभा निवडणुकीपर्यंत अर्धनग्नच राहणार!