ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; पदोन्नती कोट्यातील सर्व जागा भरणार

CM Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांचा पदोन्नतीचा अडथळा आता दूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) खटल्यामुळे पदोन्नती थांबली होती. मात्र आता राज्य सरकारने आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पदोन्नती होत नसल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

२५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेच्या स्थितीनुसार रिक्त जागा भरल्या जातील. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून, यापुढे पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व १०० टक्के पदे कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता २००४ मधील सेवाज्येष्ठता स्थितीनुसार भरण्यात यावीत.

जे अधिकारी/ कर्मचारी २००४ च्या आधी किंवा नंतर, पदोन्नती आरक्षणाचा लाभ घेऊन सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहेत, त्यांच्यानंतरचा कनिष्ठ कर्मचारी पदोन्नतीला पात्र होईल, तेव्हा २००४ च्या निर्णयानुसार पदोन्नतीचा लाभ घेतलेला अधिकारी/कर्मचारी यांचा पदोन्नतीसाठी विचार करावा. पदोन्नतीबाबत सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, त्यानुसार मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणाबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असे आदेशात नमूद केले गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER