निकषानुसारच राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे ठरवा, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Sharad Pawar - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाकोणाची वर्णी लागणार, याबाबत आद्यपही संभ्रमाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) याबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील मिळाला नसला तरी राज्यपाल नियुक्त सदस्य व अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यपाल नियुक्तसदस्यांची नावे निकषानुसारच पाठवण्यात यावी, असा सल्ला पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याची माहिती पुढे आली आहे.

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची वर्णी लागणार आहे. शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी चार जणांना संधी मिळणार आहे. ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चेअंती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही नावे सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर आणि आदेश बांदेकर ही दोन नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. ही नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

मात्र काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच कालपासून शिवसेनेनेही मातोंडकर यांना ही संधी देण्यासाठी चर्चा सुरू केल्याने काँग्रेस मध्ये एक नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यावरही दोन्ही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. राज्यपाल नियुक्त सदस्य हा कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातील असावा असा दंडक आहे. या निकषावर आपण निश्चित केलेले उमेदवार उजवे ठरावे व राज्यपालांकडून त्यावर कोणतीही हरकत घेतली जाऊ नये, हा प्रयत्न तिन्ही पक्षांचा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यकारभार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

शरद पवार व मुख्यमंत्र्यांमध्ये प्रामुख्याने राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निश्चित करण्यात आलेल्या नावांवर चर्चा झाली. त्यावर पवारांचे मत मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले. त्यानंतर अतिवृष्टीचं संकट व कांदा प्रश्नावरही दोघांमध्ये विचारमंथन झालं. अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. यापुढे केंद्राची मदत मिळावी अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. कांद्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. चहुबाजूने कोंडी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यावर केंद्र सरकारपुढे वास्तव ठेवण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, असे सू्त्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER