अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई :- शेतक-यांच्या कर्जमाफीवरून विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडीला निशाणा केले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतक-यांना पुन्हा एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

मराठी भाषादिनानिमित्त विचारांसह ठाकरे, फडणवीस, पवार, थोरात यांची मनेही जुळली !

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मागणी केली होती. राज्य सरकारने जी कर्जमाफी योजना लागू केली आहे, त्याचा लाभ सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांना मिळणार आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ऑक्टोबर २०१९ नंतर कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अजित पवार यांनी तत्काळ शेतक-यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच, २४ फेब्रुवारी रोजी ठाकरे सरकारच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली होती. कर्जमाफीच्या या यादीत ६८ गावांमधील १५ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिनाअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक करून मगच कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येतील. दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी योजना सुरू झाली आहे. तीन महिन्यांत ही कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं.