कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही – शरद पवार

Sharad pawar

सातारा : कर्जमाफी करणे हा कायमस्वरूपी शेवटचा तोडगा नाही. कर्जमाफी केल्यामुळे नियमित कर्जदारांवर अन्याय होतो. शेती व्यवसाय हवामानावर अवलंबून असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. परंतु शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक उत्पादन घ्यायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, सध्या राज्यात तीन लोकांचा महाविकास आघाडीचा संसार एकत्र बांधून चालवायचा आहे. यामध्ये एकालाच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मात्र या सरकारमध्ये सगळे समन्वयाने काम करत आहेत आणि राज्याच्या दृष्टीने हे चांगले दिशादर्शक आहे. आमच्या कार्यकाळात पूर्वी कर्जदारांना ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. या कर्जमाफीने देशातील शेतकऱ्यांना उभारी मिळाली होती. त्या काळात परदेशातून धान्य आयात करणारा आपला देश जागतिक बाजारपेठेत धान्य निर्यात करायला लागला.

सीतारामन यांचे भाषण दिशाहीन; अर्थसंकल्पात दूरदृष्टीचा अभाव : शरद पवार

त्यातून परकीय चलनासह जागतिक व्यापारात स्थान, परकीय चलन वगैरे फायदे आपल्या देशाला झाले. त्यानंतर जागतिक हवामान बदलले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यामुळे त्या-त्या राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. महाविकास आघाडी सरकारने दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. यातून ३२ लाख शेतकऱ्यांना २९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र सरसकट कर्जमाफीची, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी मदतीची मागणी केली जात आहे.

या सर्व विषयांवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार, बाळासाहेब पाटील, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदींची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती याबाबत निर्णय घेणार आहे. या समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक—निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.