अर्णव गोस्वामींविरुद्ध ‘डीसीपीं’ची बदनामीची फिर्याद फेटाळली

Abhishek Trimukhe - Arnab Goswami
  • ‘पब्लिक प्रॉसिक्युटर’ फिर्यादी नसल्याचे कारण

मुंबई : ‘रिपब्लिक टीव्ही’चे (Republic TV) प्रधान संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami), त्यांच्या पत्नी सम्यव्रत रे गोस्वामी आणि ‘एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि.’ या गोस्वामींच्या मीडिया कंपनीविरुद्ध मुंबई पोलीस दलातील एक उपायुक्त अभिषेक त्रिमुख यांनी दाखल केलेली बदनामीची फिर्याद सत्र न्यायालयाने फेटाळली.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेवर गोस्वामी यांनी त्यांच्या टीव्हीवरील चर्चात्तमक कार्यक्रमात केलेल्या काही विधानांवरून बदनामीचा खटला चालविण्यासाठी त्रिमुख यांनी सत्र न्यायालयातील पब्लिक प्रॉसिक्युटरच्या मार्फत ही फिर्याद दाखल केली होती. परंतु ही फिर्याद कायद्यातील तरतुदींनुसार दाखल केलेली नसल्याने ती स्वीकारली जाऊ शकत नाही, असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश उदय एम. पडवड यांनी ती फेटाळली.

न्यायाधीशांनी नमूद केले की, दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १९९(२) नुसार अशी फिर्याद फक्त पब्लिक प्रॉसिक्युटरच दाखल करू शकतात. ज्या व्यक्तीची बदनामी झाल्याचा आरोप आहे अशी व्यक्तीही या कलमानुसार फिर्याद दाखल करू शकत नाही. मात्र प्रस्तूत प्रकरणातील फिर्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसते की सदरची फिर्याद वास्तवात पब्लिक प्रॉसिक्युटरने केलेली नसून त्यांनी त्रिमुखे यांची फिर्याद आपल्या मार्फत दाखल केली आहे. असे करणे कायद्याला धरून नाही.

आपल्या या निष्कर्षाचा अधिक खुलासा करताना न्यायालयाने निकालात म्हटले की, ही फिर्याद दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडे संमती मागण्यात आली होती. त्यानुसार सरकारने जी संमती दिली आहे ती पब्लिक प्रॉसिक्युटरना दिली आहे. परंतु पब्लिक प्रॉसिक्युटरने स्वत: फिर्याद दाखल न करता त्रिमुखे यांच्या फिर्यादीच्या खाली स्वत:ची फक्त स्वाक्षरी केली आहे. याने पब्लिक प्रॉसिक्युटर स्वत: फिर्यादी होत नाहीत. वास्तवात ही फिर्याद त्रिमुखे यांची असून ती पब्लिक प्रॉसिक्युटरच्या माध्यमातून दाखल केली गेली आहे. कायद्याच अशा प्रकारची फिर्याद अभिप्रेत नाही.

न्यायाधीश पडवड यांनी पुढे म्हटले की, अशा  प्रकारच्या फिर्यादीमध्ये जिची बदनामी केली गेल्याचा आरोप असतो त्या व्यक्तिची भूमिका साक्षीदाराची असते व तिची साक्ष खटल्यात नोंदवावी लागते. एरवी सामान्य  नागरिकाला अशी बदनामीची फिर्याद करायची असेल तर तो तशी फिर्याद दंडाधिकार्‍यांकडे दाखल करू शकतो. पण जिची कथित बदनामी झाली ती व्यक्ती सरकारी अधिकारी असेल व तिला स्वत: फिर्याद करण्याखेरीज सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. प्रस्तूत प्रकरणात त्रिमुखे यांनी स्वत: फिर्याद न करता ती सरकारतर्फे दाखल केली आहे. पण ती ज्या पद्धतीने दाखल केली गेली आहे त्यामुळे बदनामी झालेली व्यक्तीच फिर्यादी झाली आहे. सरकारतर्फे दाखल करायची फिर्याद पब्लिक प्रॉसिक्युटरनेच करावी लागते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button