…अन्, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उध्दव ठाकरेंची बाजू घेत भाजपाचे कान टोचले!

Mahavikas aghadi

मुंबई: राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी यावरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करत भाजपाने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र विरोधकांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला चिमटा घेतला आहे. अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्षात असताना आंदोलन करावं लागतं, आम्हीही विरोधी पक्षात असताना पायऱ्यांवर बसायचो, आंदोलन करायचो, आम्हालाही मागचे दिवस आठवले. पायऱ्यांवर घोषणाबाजी करायचो. परंतु, विरोधक ज्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत ते प्रश्न आमच्या सरकारने सोडवलेले आहेत. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ झालेला आहे. त्यामुळे भाजपाला आंदोलन करण्याची गरज नाही. दोन-तीन महिन्यात कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे असे अजित पवार यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची बाजू घेत भाजपाचे कान टोचले.अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना सोबत घेऊन जात आहे. सभागृहात काही आयुधे आहेत त्याचा वापर करुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावे, आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचं काम करतंय. भाजपाला आंदोलन करण्याची गरज भासणार नाही असं काम करणार आहोत, २-३ महिनेच सरकार येऊन झालेत त्यामुळे आणखी काही दिवस जाऊद्या असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दुस-या दिवशी म्हणजे आज भाजपाकडून राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कर्जमाफी, पोलीस दलाचे खच्चीकरण, वाढती गुन्हेगारी या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विधानभवनात आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी काहीपण : विधान परिषदेतील शिवसेनेचे नेतेपदही पवारांनी पळवले