१०० दिवस होऊनही माझ्या ‘दादा’ला घर मिळाले नाही, सुप्रिया सुळेंची खंत

ajit-pawar-supriya-sule copy.jpg

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन ११० दिवस झाले तरीही मागच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आपले बंगले सोडले नाही. त्यामुळे आमच्या ‘दादा’ला अजूनही घर मिळालं नाही. अशी खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. तसेच एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी बंगलेच सोडले नसल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपाला लगावला. रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात त्या बोलत होत्या.

यावेळी सुळे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना मंत्रालयात भेटायचं असेल तर ते अशक्य आहे. एकतर अजित पवार हे सकाळी ७ वाजताच मंत्रालयात हजर होतात. लोकांच्या घरातील दरवाजे उघडण्याआधी दादा तिथे पोहचतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे, आमच्या भावाला अजूनही बंगलाच मिळाला नाही.

दरम्यान, भाजपा सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहण्यासाठी देण्यात आला होता. मात्र नवीन सरकार आल्यापासून १०० दिवस झाले तरी मुनगंटीवारांनी अद्याप देवगिरी बंगला सोडलेला नाही. त्यामुळे अजित पवार सध्या चर्चगेटच्या एका इमारतीत राहत आहेत.