अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला बेड्या

dawood-ibrahim-nephew-rizwan-kaskar-arrested

मुंबई : व्यवसायाच्या बहाण्याने बड्या व्यापार्‍यांशी ओळख वाढून त्यांच्याकडून पैसे उकळल्यानंतर ते परत न मागण्यासाठी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा साथिदार फईम मचमच याच्याकडून व्यापार्‍यांना धमकावणार्‍या दाऊदचा पुतण्या आणि इक्बाल कासकर याचा मुलगा मोहम्मद रिझवान इक्बाल हसन शेख इब्राहीम कासकर (30) याच्यासह तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईतील व्यापार्‍यासोबत अश्फाक रफीक टॉवेलवाला (34) याने विदेशातून भारतात विविध वस्तू आयात करण्याचा भागिदारीमध्ये व्यवसाय सुरु केला. त्यानंतर व्यवसायातून मिळालेली 15 लाख 50 हजार रक्कम टॉवेलवाला याने त्या व्यापार्‍याला देण्यास टाळाटाळ सुरु केली. यातून वाद निर्माण झाल्यानंतर मात्र दाऊदचा साथिदार फईम मचमच याचा त्या व्यापार्‍याला फोन आला. टॉवेलवाला याच्याकडे पैसे मागितल्यास याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी थेट धमकी फईम मचमच याने त्याला दिली.

डी गँगकडून आलेल्या या धमकीने घाबरलेल्या व्यापार्‍याने मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे धाव घेत याबाबत लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तपास सुरु केला असता धमकीचे हे कॉल दुबईमधून आल्याचे स्पष्ट झाले. अधीक तपासात यामध्ये अहमदराजा वधारीया (24) याचा सहभाग समोर येताच गुन्हेशाखेने त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस बजावली. वधारीया हा दुबईतून विमानाने सोमवारी मुंबईत येताच गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

वधारीया याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने रिझवान कासकर याने त्याची ओळख दाऊदचा खास हस्तक छोटा शकील आणि फईम मचमच यांच्यासोबत करुन दिली. त्यानंतर तो व्यापार्‍यांना खंडणीसाठी तसेच, व्यवसायातील पैसे परत न मागण्यासाठी धमकाऊ लागल्याचे स्पष्ट झाले. वधारीया याला अटक झाल्याचे समजताच रिझवानने दुबईला पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसला. गुन्हेशाखेने त्याला विमानतळावरुन बेड्या ठोकल्या. याच गुन्ह्यात टॉवेलवाला यालाही गुन्हे शाखेने अटक केली आहे.

तिघांनीही अशाप्रकारेच मुंबईसह गुजरातमधील अनेक बड्या व्यापार्‍यांना व्यवसायाच्या बहाण्याने गळाला लाऊन त्यांच्याकडून पैसे उकळले, तसेच पैसे परत न मागण्यासाठी धमकावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत गुन्हेशाखा तिघांकडेही कसून चौकशी करत आहे. न्यायालयाने तिघांनाही 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेच्या कारवाईमूळे अंडरवर्ल्ड जगतात एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : अभिनेता एजाज़ खानला अटक

ही बातमी पण वाचा : फहीम मचमचच्या साथीदाराला विमानतळावरुन अटक