फ्लॅशबॅक : डेव्हिड धवन- प्रेक्षकांच्या मनोरंजनाची नस ओळखलेला दिग्दर्शक

David Dhawan

बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रेक्षकांचे फुल टू पैसा वसूल मनोरंजन करणारे चित्रपट जो देतो तो यशस्वी मानला जातो. प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई ही या श्रेणीतील मोठी नावे. प्रेक्षकांना हाणामारी, कॉमेडी, संगीत आणि त्यात नात्यांचा तडका दिला की प्रेक्षकांचे तीन तास मनोरंजन होते असे मानणारे अनेक निर्माता-दिग्दर्शक आहेत. यात डेव्हिड धवनचेही (David Dhawan) नाव प्राधान्याने घेता येईल. मनमोहन देसाई यांना गुरू मानणाऱ्या डेव्हिड धवनने अनेक मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. ६५ व्या वर्षीही डेव्हिड धवन दिग्दर्शन करीत आहेत.

डेव्हिड धवनने नंबर वन सीरीजचे अनेक यशस्वी चित्रपट दिले असल्याने त्याला एंटरटेनर नंबर वन म्हणूनही ओळखले जाते. डेव्हिड धवनशी गप्पा मारताना खूप मजा येते. त्याला स्वतःलाही गप्पा मारायला खूप आवडते. त्यामुळे विविध विषय काढून तो बोलत बसतो. सेटवरही शूटिंग सुरू असतानाही वेळ मिळाला की तो गप्पा मारतो. त्याची आणखी एक सवय म्हणजे त्याच्या तोंडात सतत शिव्या असतात. अर्थात हे तो जाणूनबुजून करतो असे नाही तर ती त्याची पूर्वीपासूनच सवय आहे. अनेक चित्रपटांच्या सेटवर त्याची ही सवय पाहिली आहे. त्याच्याशी पहिली भेट १९९५ मध्ये कुली नंबर वनच्या सेटवर झाली होती. गोविंदा, करिश्मा कपूर अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. त्यानंतर त्याच्या जवळ-जवळ प्रत्येक अगदी दोन वर्षांपूर्वी आलेल्या जुडवा-२ पर्यंत त्याच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. मात्र जुडवा-२ च्या वेळेस तो पूर्वीसारखा डेव्हिड धवन नसल्याचे जाणवले होते. अर्थात आजारपण आणि वयाचाही परिणाम असावा.

१६ ऑगस्ट १९५५ ला डेव्हिड धवनचा पंजाबी हिंदू कुटुंबात आगरतला येथे जन्म झाला. त्याचे खरे नाव राजिंदर धवन. डेव्हिडचे वडील यूको बँकेत मॅनेजर होते. त्यांची कानपूर येथे बदली झाल्याने डेव्हिड लहानाचा मोठा कानपूरमध्येच झाला. त्याचे शेजारी आणि अनेक मित्र ख्रिश्चन असल्याने ते त्याला डेव्हिड म्हणून हाक मारीत आणि राजिंदरने डेव्हिड हेच नाव धारण केले. लहानपणापासून चित्रपट पाहण्याचे व्यसन असल्याने त्याने बारावीनंतर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. परंतु तेथे ‘एक से एक’ दिग्गज अभिनेते असल्याचे पाहून त्याने एडिटिंगकडे आपला मोहरा वळवला. एडिटिंग करतानाच त्याला नक्की काय हवे आणि काय नको याची माहिती मिळाली आणि याच माहितीचा उपयोग करून त्याने नंतर प्रेक्षकांना उसंत न देणारे चित्रपट तयार केले. १९८९ मध्ये ‘ताकतवर’ हा डेव्हिडने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. संजय दत्त आणि गोविंदा चित्रपटाचे नायक होते तर नायिका होत्या नीलम आणि अनिता राज.

याच चित्रपटादरम्यान त्याची, गोविंदाची आणि संजय दत्तची मैत्री झाली. यानंतर डेव्हिड धवनने आग का गोला, आंधिया, जुर्रत, गोलाबारुद चित्रपट केले. परंतु त्याला यश काही गवसत नव्हते. राजेश खन्ना आणि गोविंदा अभिनीत ‘स्वर्ग’ थोडाफार चालला होता. यानंतर त्याने १९९२ मध्ये गोविंदा आणि दिव्या भारतीला घेऊन ‘शोला और शबनम’ चित्रपट केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी झाला आणि त्यानंतर मात्र डेव्हिड धवनच्या यशाची कमान चढतीच राहिली. ‘शोला और शबनम’नंतर डेव्हिड धवनने गोविंदा, चंकी पांडेसोबत ‘आंखे’ चित्रपट केला. या चित्रपटाने धुमाकूळ घातला आणि डेव्हिड धवनकडे निर्मात्यांचा ओघ वाढला. गोविंदाबरोबर त्याची चांगली केमिस्ट्री जुळली. या दोघांनी एक-दोन नव्हे तर १७ चित्रपट केले आणि सर्व हिटही झाले. डेव्हिड धवनच्या चित्रपटात प्रेक्षकांना संपूर्ण मसाला मिळत असे. कुली नंबर वन, हीरो नंबर वन, साजन चले ससुराल, बडे मियां छोटे मियां, राजा बाबू, दीवाना मस्ताना, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, जोडी नंबर वन- हे त्यांचे काही यशस्वी चित्रपट. डेव्हिड धवनने फक्त गोविंदाच नव्हे तर अमिताभ बच्चन, संजय दत्त, सलमान खान, ऋषी कपूर, अजय देवगण, अक्षयकुमार, अनिल कपूर यांच्यासोबतही हिट चित्रपट दिले.

डेव्हिडच्या तोंडातील शिव्यांचा उल्लेख मी वर केलाच आहे. त्याच्या या सवयीमुळेच ‘हम किसी से कम नहीं’च्या सेटवर अजय देवगणचा मार खाता खाता तो वाचला होता. संजय दत्तने अजय देवगणला अडवले होते. परंतु नंतर दोघांची गट्टी झाली ही वेगळी गोष्ट. कुली नंबर वनने नंबर वन सीरीजची सुरुवात करणारा डेव्हिड आता पुन्हा एकदा कुली नंबर वनची रिमेक तयार करीत असून त्याचा मुलगा वरुण आणि सारा अली खान यात नायक-नायिकांची भूमिका साकारीत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दोन मुलांपैकी एक मुलगा वरुण नायक आणि दुसरा मुलगा रोहित हा दिग्दर्शक असून त्याने जॉन अब्राहम, वरुणला घेऊन ‘ढिशूम ढिशूम’द्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बाप-बेटे दिग्दर्शक आणि दुसरा मुलगा नायक हे अभावानेच पाहायला मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER